चंदगड काजू कारखानदारांना कोटीचा गंडा घालणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2019

चंदगड काजू कारखानदारांना कोटीचा गंडा घालणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका हा काजू उत्पादनातील महाराष्ट्रातील सधन तालुका म्हणून ओळखला जातो. अनेक सुशिक्षित युवक रोजंदारी चा प्रश्न मिटावा म्हणून काजू कारखानदारी कडे वळले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा तेजीत चालू असताना मुंबई , जयसिंगपूर येथील तीन व्यापाऱ्यांनी काजू गरांना चांगला दर मिळवून देतो म्हणून विश्वास संपादन करून 4 कोटी 19 लाख 76 हजार 741 रुपयाची काजू उचल करून तालुक्यातील वीस काजू कारखानदारांना गंडा घातला आहे .वेळोवेळी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आज अखेर चंदगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्यात आली.
 महाराष्ट्रातील सर्वाधिक काजू उत्पादन करणारा तालुका म्हणून चंदगड तालुक्याकडे   बघितले जाते.  अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी रोजी रोटीचा प्रश्न मिटावा म्हणून छोटे-मोठे काजु उद्योग सुरू केले आहेत .चंदगड तालुक्यात 200 पेक्षा जास्त काजू कारखानदार असून सुमारे वीस हजार महिला आणि तरुणांना या काजू प्रक्रियेतून रोजगार मिळाला आहे.  उत्तम प्रतीची आणि चवदार काजु म्हणून चंदगडच्या काजूला परदेशात मोठी मागणी आहे .काजूला जादा दर मिळवून देतो म्हणून रत्नागिरी येथील सिद्धेश रघुनाथ चव्हाण,
मुंबई येथील उमेश वारसे व जयसिंगपूर येथील प्रदीप पाटील या तीन भामट्या व्यापाऱ्यानी चंदगड तालुक्यातील 20 काजू कारखानदारांना 4 कोटी 19 लाख 76 हजार 741 रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत तुडये येथील कारखानदार विनोद खाचू पाटील यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे .तालुक्यातील कारखानदारांनी राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्थांची कर्ज काडून काजू खरेदी केली त्यावर प्रक्रिया करून उत्पादित केलेल्या मालाला मुंबई-गुजरात बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने गेल्या पाच-सहा वर्षांत या धंद्याने चांगली उभारी घेतली होती .परंतु सतत मुंबई पुणे गुजरात बाजारपेठेतून मला विक्री करण्यास वेळ मिळत नसल्याने चंदगड तालुक्यात सतत वावर असणाऱ्या सिध्देश चव्हाण, उमेश वारसे आणि प्रदीप पाटील या तिघांनी संगनमताने तालुक्यातील वीस-वीस काजू कारखानदारांना चांगला भाव देतो असे सांगून 4 कोटी 19 लाख 76 हजार 761 काजूगर 19 ऑगस्ट 2018 ते 24 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत उचल केली .त्यानंतर  काजूगराच्या पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्या कारणाने वरील तिघांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक ए.एन.सातपुते करत आहेत.


No comments:

Post a Comment