सुंडीच्या सवती वझर धबधब्यांवर पर्यटकांची मांदियाळी, पर्यटनाचा आनंद घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2019

सुंडीच्या सवती वझर धबधब्यांवर पर्यटकांची मांदियाळी, पर्यटनाचा आनंद घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित
सुंडी येथील सवती वझर धबधब्याचे विहंगम दृश्य.
निवृत्ती हारकारे / कार्वे
अल्पावधीतच सुप्रसिद्ध झालेल्या सुंडी येथील सवती वझर धबधब्यांवर पर्यटकांची मांदियाळी  सुरू आहे.  शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची तुफान गर्दी या धबधब्यावर होत आहे. पर्यटकांकडून येथील शेतकऱ्यांच्या पिकांची होत असलेली नासधूस, धबधब्याजवळ व रस्त्यावर करत असलेला प्लास्टिक कचरा व मध्याच्या फोडण्यात येत असलेल्या बाटल्या यामुळे येथील स्थानिक नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. निसर्गावर प्रेम करा, पर्यटनाचा आनंद लुटा असे आवाहन सुंडी ग्रामस्थ करीत आहेत. रविवार व सुट्टीच्या दिवशी या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाईसाठी येथील तरुण कार्यकर्ते तयार आहेत, मात्र दिमतीला एखादा पोलीस कर्मचारी असावा अशी मागणी येथील ग्रामस्था मार्फत करण्यात येत आहे.
                                                 धबधब्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी.
किल्ले महिपाळगडाच्या पायथ्याशी डोंगर कपारीत हा धबधबा आहे. चंदगड तालुक्याच्या निसर्गसौंदर्यात एक मानाचा तुरा या धबधब्याने रोवला आहे. अगदी अल्पावधीतच पर्यटकांना या धबधब्याने आकर्षित केले आहे. बेळगाव पासून 22 किलो किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात हा धबधबा आहे. पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर या धबधब्यावर जावे असे म्हटले जाते. चंदगड तालुकाच सध्या पर्यटनाच्या दृष्टीने भारताच्या नकाशावर ठळक होत आहे. जंगमहट्टी, झांबरे, फाटकवाडी, तिलारी यासारखे मध्यम प्रकल्प, तिलारी परिसरातील घाटमाथ्यावरील निसर्ग, स्वप्नवेल पॉईंट, किल्ले पारगड यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे चंदगड तालुक्यात आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच तालुक्याकडे वळत आहेत. किल्ले महिपाळगडावरून दिसणारा विलोभनीय निसर्ग. एका बाजूस हेमाडपंथी वैजनाथ मंदिर तर दुसऱ्या बाजूला सुंदर असा धबधबा व सुंडी येथील पाटबंधारे प्रकल्प अगदी डोळ्याचे पारणे फिटते. अशा या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची वाढती संख्या यात नवल ते कसले.
                                       हुल्लडबाज तरुण पर्यटकांमुळे ग्रामस्थ त्रस्त.
या सवती वझर धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव, विजापूर, खानापूर, चिकोडी, गोकाक सह चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. मात्र निसर्गाचे सौंदर्य उपभोगण्याच्या नादात त्याचा घात करण्याचे कृत्य पर्यटकांकडून होत आहे. मुख्य रस्त्यापासून धबधब्याकडे जाणार्‍या वाटेवर व बाजूच्या शेतीत प्लास्टिकचा कचरा टाकणे, मद्यपान करून रिकाम्या फोडलेल्या बाटल्या फोडून कुठेही फेकणे, यामुळे त्याचा त्रास येथील शेतकऱ्यांना होत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या पाण्यातून सरळ सुंडीच्या लघुपाटबंधारे प्रकल्पात जात आहेत. धरणातील पाणी प्रदूषित होत आहे. सवती वझर धबधब्याचे ठिकाण जितके नैसर्गिक आणि प्रदूषण मुक्त आहे, तितकेच येथील पर्यटकांकडून ते प्रदूषित केले जात आहे. त्यामुळे पर्यटकांनी अशा पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करावा, दिलेल्या सूचनांचे पालन करावे, कचऱ्यासाठी केलेल्या नियोजनाचा अवलंब करावा व पर्यटनाचा मन आनंद लुटावा अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ बाळगून आहेत.
                                     
ग्रामस्थांनी स्वनिधीतून धबधब्यापर्यंत बांधलेल्या पायऱ्या व आधार कंपाऊंड.
  ग्रामस्थांनीच घेतली विकासाची जबाबदारी.
सवती वझर धबधब्याचा बोलबाला होत गेला तशी पर्यटकांची वर्दळ वाढत गेली. मात्र येथे कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. सुंडी गावातील अबालवृद्धांनी एकत्र येऊन येथे विकास करण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी सवती धबधबा विकास कमिटी स्थापन केली. प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत. त्यामुळे येथील तरुणांनी एकत्र येऊन गावातील सर्व आबालवृद्धांना एकत्र केलं. पर्यटकांकडून विकास निधी म्हणून प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे पावती पाडण्यास सुरुवात केली. सर्व ग्रामस्थांनी जमेल तितकी स्वतःच्या खिशातून मदत केली. दीड-दोन लाख रुपये एकत्र केले. धबधब्याच्या ठिकाणी खाली उतरण्यासाठी लागणाऱ्या पायर्‍यांचे बांधकाम व दोन्ही बाजूस आधारासाठी लोखंडी सळीचे कंपाऊंड बांधले. यामुळे आता लहानांपासून वृद्धापर्यंत पर्यटक सहजरीत्या धबधब्यापर्यंत पोहचू शकतात. इतके महत्त्व प्राप्त झालेल्या या धबधब्यावर अजूनही शासनाचा एक रुपयाही लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला नाही. हेच इथले दुर्दैव आहे. भविष्यात धोक्याच्या ठिकाणी काटा तार मारणे, कचराकुंड्या व वाटेत साकव बांधण्याची कामे पूर्ण करण्याचा  येथील ग्रामस्थांचा मनोदय आहे. सध्या याठिकाणी छोटी छोटी दोन-तीन हॉटेल सुरू करण्यात आली असल्याने पर्यटकांची सोय होत आहे.
                                            पोलिसांचे सहकार्य अपेक्षित.
रविवार व सुट्टीच्या दिवशी हजारभर पर्यटक येथे येत असतात. दुपारी तीन पर्यंत सगळं सुरळीत असतं, मात्र दुपारनंतर मध्यधुंद पर्यटक दंगामस्ती करतात. किती तरी वेळा हाणामारीचे प्रसंग या ठिकाणी उद्भवले आहेत. पर्यटकांमधील मारामारी सोडविण्यास गेलेल्या येथील स्थानिक ग्रामस्थांना पर्यटकांनी मारहाण केल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी येथील तरुण कार्यकर्ते तयार आहेत. मात्र त्यांच्या दिमतीला एखादा पोलीस कर्मचारी सोबत असावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून रविवार व सुट्टीच्या दिवशी पोलिस कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी होत आहे.

हुल्लडबाज पर्यटकांना आवरण्यासाठी पोलिसांनी सुट्टीच्या दिवशी येथे हजेरी लावावी.  सर्व पर्यटकांना तपासून त्यांच्याकडून मद्याच्या बाटल्या जप्त करुन  त्यांच्यावर कारवाई केल्यास बऱ्याच गोष्टींना आळा बसेल.
 संजय पाटील :-(अध्यक्ष :-सवती वझर धबधबा विकास समिती.)
निवृत्ती हारकारे, कार्वे

No comments:

Post a Comment