हलकर्णी एमआयडीसीच्या अशुद्ध जलपुरवठा केंद्राची सुरक्षा रामभरोसे - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2019

हलकर्णी एमआयडीसीच्या अशुद्ध जलपुरवठा केंद्राची सुरक्षा रामभरोसे

पाणीपुरवठा केंद्राची सुरक्षा धोक्यात, रंगीत पार्ट्या बरोबरच पर्यटकांचे मुक्कामही येेथेेेच

जंगमहट्टी प्रकल्पाजवळील हलकर्णी औद्योगिक वसाहतीला शुद्ध पाणीपुरवठा करणारे केंद्र.
निवृत्ती हारकारे / मजरे कार्वे
हलकर्णी (ता. चंदगड) येथील एम. आय. डी. सी. ला पाणीपुरवठा करणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठा केंद्रांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. या केंद्राची सिक्युरिटीज गायब झाल्याने  येथे परगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हे पर्यटक संध्याकाळी रंगीत पार्टी बरोबरच नसलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी मुक्काम ठोकत आहेत.
दिवसभर या परिसरात जंगमहट्टी, कलिवडे परिसरातील महिला शेतीकामासाठी येत असतात. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच -सहा वाजेपर्यंत या महिला दिवसभर या शेतात काम करत असतात. सध्या या जल पुरवठा केंद्राजवळ कुठल्याही प्रकारचे सिक्युरिटी नाही. त्यामुळे येथे दिवसभर पर्यटकांच्या रंगीत पार्ट्या सुरू असतात. रंगीत पार्ट्या मधील बरेचसे पर्यटक दिवसभर आजूबाजूच्या शेतांमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतीत काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल ची सुरक्षा एका खाजगी सिक्युरिटी कडे देण्यात आल्याचे समजते. मात्र दुपारी एक दोन तास वगळता ही सिक्युरिटी याठिकाणी उपस्थितच नसते. त्यामुळे या सिक्युरिटी बद्दल या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे.
चंदगड तालुक्याच्या निम्म्या भागाला वरदान ठरलेला जंगमहट्टी प्रकल्प, या प्रकल्पा जवळच हे  पाणीपुरवठा केंद्र आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा केंद्राबरोबरच या जंगमहट्टी धरणाचीही सुरक्षा धोक्यात आहे. कित्येक वेळा या  धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. मात्र शासकीय पातळीवर याची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. त्यातच या अशुद्ध जल पुरवठा केंद्राच्या सिक्युरिटी चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण एमआयडीसीच्या प्रकल्प ना याच ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या केंद्राची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते.
या परिसरात पहाटे कामानिमित्त जाणाऱ्या शेतकऱ्यांना कितीतरी वेळा मुक्कामी असलेले पर्यटक नको त्या अवस्थेत पहावयास मिळाले आहेत. हीच परिस्थिती दिवसभर असलेल्या रंगीत पार्ट्या मधून सुद्धा असते. त्यामुळे येथे सहकुटुंब पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची पंचायत होत आहे. एमआयडीसी प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून लवकरात लवकर जंगमहट्टी  धरणावर व एमआयडीसीच्या अशुद्ध जल पुरवठा केंद्रावर 24 तास सुरक्षा पुरवावी अशी मागणी होत आहे.
निवृत्ती हारकारे, मजरे कार्वे

No comments:

Post a Comment