कुणी घर देता का घर...... चिंचणे येथील कोलगे दांपत्याची आर्त विनवणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2019

कुणी घर देता का घर...... चिंचणे येथील कोलगे दांपत्याची आर्त विनवणी

भाडोत्री जागेत थाटलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या निवाऱ्यासह चिंचणे येथील निराधार श्रीदेवी व जयसिंग कोलगे दांपत्य.
श्रीकांत पाटील / कालकुंद्री प्रतिनिधी
कुणी घर देता का घर........ जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.....  कुणी घर देता का घर ? नटसम्राट नाटकातील हा संवाद म्हणण्याची वेळ चिंचणे ता. चंदगड येथील अंध श्रीदेवी व तिचा पती जयसिंग कोलगे (कांबळे) या दुर्दैवी दाम्पत्यावर आली आहे. 
जयसिंग गणपती कोलगे याचे दुर्देव गेली बावीस वर्षे त्याचा पिच्छा पुरवत आहे. त्याचे मूळगाव कौलगे (ता. गडहिंग्लज).सन १९९३ मध्ये त्याचे लग्न चिंचणे येथील शांता हीच्याशी झाले .सासऱ्याच्या संमतीने तो चिंचणे येथेच सासर्‍याने दिलेल्या जागेत पत्नी शांता सह राहू लागला. तेव्हापासून तो चिंचणेचा नागरिक झाला. लग्नानंतर काही महिन्यात त्याची पत्नी आजारी पडली वीस वर्षे आजारी पत्नीला बरे करण्याचा खटाटोप शेवटी २०१३ ला पत्नी शांताच्या निधनामुळे संपुष्टात आला .तिच्या औषधोपचाराच्या खर्चाने चांगलाच कर्जबाजारी झाला आहे. त्यात सासर्‍याने आपल्या मुलीच्या मृत्यूबरोबर त्याला दिलेला आसरा काढून घेतला. त्यामुळे पंचवीस वर्षांच्या वास्तव्यानंतरही तो बेघर झाला.
एकमेकाला आधार म्हणून जयसिंगने निमशिरगाव ता. शिरोळ येथील अंध श्रीदेवी सुकुमार गवंडी (कांबळे) हिच्याशी २०१५ मध्ये दुसरा विवाह केला. जयसिंग व  श्रीदेवी कडेही असलेले आधार कार्ड, अंत्योदय रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र , जात प्रमाणपत्र आदी पुरावे चिंचणेची नागरिकत्व सिद्ध करतात.   मोलमजुरी व दुसऱ्यांची बकरी पाळून उदरनिर्वाह करणारे हे दाम्पत्य गावातील एका सहृदयी कडून मिळालेल्या भाड्याच्या जागेत पत्र्याचा आडोसा करून दिवस कंठत आहे. वाळू उत्पादनामुळे अचानक प्रकाशझोतात आलेल्या चिंचणे गावाला मोठे गावठाण ,गायरान असून सुद्धा निराधार भूमिहीन कोलगे दाम्पत्याने अनेक वेळा घरकुल मागणी  केल्यानंतर पात्र असूनही त्यांना ते का मिळत नाही? याचे गौडबंगाल काय ?असा सवाल चिंचणे च्या काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. घर फिरले की घराचे वासेही फिरतात असे म्हटले जाते पण शासनदरबारी आपल्याला न्याय मिळवून एक दिवस हक्काचा निवारा मिळेल या आशेवर हे दांपत्य जीवन कंठत आहे .श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शन साठी या दांपत्याने अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत या बेघर दांपत्याला गावातील जागा व घरकुल मंजूर व्हावे अशी अपेक्षा चिंचणे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
श्रीकांत पाटील, कालकुंद्री










No comments:

Post a Comment