जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांची थकीत बिले द्यावीत व नंतरच साखर विक्री करावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांना देताना अॅड. संतोष मळविकर, प्रा. एन. एस. पाटील, सुधीर देशपांडे आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा बँकेने प्रथम शेतकऱ्यांचे पैसे अदा केल्याशिवाय साखर विक्री करू नये अशी मागणी न दौलत बचाव समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
न्यूट्रियन्स कंपनीने गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. एफ. आर. पी. नुसार सात ते आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे आहेत. तथापि दौलत साखर कारखान्यात बारा ते चौदा कोटी रुपयांची साखर पडून आहे. सदर साखरेवर के. डी. सी. सी. बँकेचे कर्ज आहे. म्हणून के. डी. सी. सी. बँक फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सदर साखर विकण्याचे टेंडर काढले आहे. या अगोदर तालुक्यातील शेतकऱ्यांची दोन वेळा फसवणूक झाली असून वेगवेगळ्या बिला संदर्भात कामगार व शेतकऱ्यांनी तोंडी व लेखी सूचना के. डी. सी. सी. चे चेअरमन हसन मुश्रीफ यांना दिल्या आहेत. तथापि चेअरमन व संचालक मंडळाने या प्रकाराकडे गंभीरतेने न पाहता साखर विक्रीचे टेंडर काढले आहे. दौलतमध्ये असणाऱ्या साखरेची विक्री करून त्यातील मिळालेल्या पैशातून बँक, शेतकरी व कामगार यांच्यामध्ये समान वाटप व्हावे अशी मागणी दौलत बचाव समितीचे अध्यक्ष ॲड. मळविकर व शेतकरी वर्गाने वेळोवेळी केली आहे. संचालक मंडळ व चेअरमन या मागणीकडे कानाडोळा करत आहे. दौलत मधील शेतकऱ्यांची थकित बिले प्रथम खात्यावर जमा करावी किंवा शिल्लक साखरेतून मिळणाऱ्या पैशाचे समान तीन वाटप (बँक ,शेतकरी, कामगार) यांच्यामध्ये होणार असल्याचा लेखी करार करावा आणि नंतरच साखर विक्री करावी. सदरच्या मागणीकडे बँकेने अथवा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे बँकेने साखर विक्रीचे काढलेले टेंडर रद्द करून शेतकऱ्यांची बिले प्रथम जमा करावी. त्यानंतरच साखर विक्री करावी अशी मागणी केली आहे. यावेळी निवेदनावर ॲड. मळविकर यांच्यासह प्रा. एन. एस. पाटील, सुधीर देशपांडे, राजेंद्र कूट्रे, सोमनाथ हिरेमठ, अनिल गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment