तिलारी घाटात दरड कोसळून रस्ता रस्ता खचल्याने वाहतुक ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2019

तिलारी घाटात दरड कोसळून रस्ता रस्ता खचल्याने वाहतुक ठप्प

तिलारी घाटात रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याकडेला असेलली दरड कोसळून रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणू सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील वाहतुक सद्या बंद ठेवली आहे. पहाटेच्या दरम्यान हि घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागासह महसुल विभाग व पोलिस प्रशासनाने घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी करुन लागलीच रस्ता वाहतुकीला बंद केला. खचलेला भाग पूर्ववत करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याचे काम सुरु होते. मात्र संततधार पावसामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. सकाळी काही काळ एकेरी वाहतुक सुरु होती. मात्र आता संपुर्ण वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पुढील दहा दिवस या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. 

तिलारी घाटातील रस्ता यापूर्वी एम. एस. ई. बी. च्या ताब्यात होता. दिड वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावेळी बांधकाम विभागाने या रस्त्याची नव्याने डांबरीकरण करुन डागडुजीही केली होती. तिलारी घाट हा नागमोडी वळणांचा असल्यामुळे वाहतुकीलाही धोकादायक आहे. तिलारी घाटामध्ये रस्त्याच्या बाजुला खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी खुदाई करुन त्यातून केबल टाकली आहे. केबलसाठी केलेल्या खुदाईमुळे हा रस्ता खचल्याची चर्चा लोकांतून होती. 
या मार्गावरील चंदगड डेपोच्या दोन फेऱ्या व कोल्हापूर डेपोच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतुक आजरा-आंबोलीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना 50 ते 60 किलोमीटर भाड्याचा भुर्दंड बसणार आहे.

रस्त्याच्या बाजुला बांधलेली संरक्षक दगडी भिंत व रस्त्यामध्ये पाणी साचल्याने संरक्षक भिंत कोसळल्याने त्यासोबत रस्त्याही खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक सद्या बंद ठेवण्यात आली आहे. तिलारी घाटाच्या माथ्यावर या मार्गावरील वाहतुक रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर घाटाच्या खाली चेकनाका असून तेथेही वाहतुक रोखण्याची व्यवस्था केली आहे. रस्त्यावर एकेरी वाहतुक सुरु करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून नवीन भिंत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एकेरी वाहतुक हळु-हळु सुरु झाल्यानंतर पुढील वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. या कामाला साधारणपणे दहा दिवस लागतील अशी अपेक्षा असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मांजरेकर
 यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment