लाईफलाईन इन्फोकेअर कंपनीचा कार्यालयाबाहेरील फलक |
चंदगड / प्रतिनिधी
लाईन लाईन केअर या फायनान्स कंपनीकडून चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज, कागल, आजरा व अन्य ठिकाणच्या दिडशेहून अधिक ग्राहकांची कोट्यावधीची फसवणुक झाल्याची शक्यता आहे. आज प्रत्यक्ष कर्ज वाटपासाठी येणारे कंपनीचे अधिकारी दुपारपर्यंत वाट बघूनही न आल्याने आपली फसवणुक झाल्याचे समजून चंदगडमधील लाईफ लाईन केअर कंपनीच्या कार्यालयात ग्राहकांनी गोंधळ घातला.
लाईफलाईन इन्फोकेअर कंपनीच्या बाहेर लोकांनी केलेली गर्दी व ग्राहक. |
घटनास्थळी ग्राहक व लोकांतून चाललेल्या चर्चावरुन लाईन लाईन इन्फोकेअर कंपनी ग्राहकांना प्रत्येकी सहा लाख रुपयांचे कर्ज वाटप करणार होती. त्यासाठी कंपनीच्या वतीने प्रोसेसिंग फी व इन्शुरन्स यासाठी 22110 रुपये भरुन घेतले होते. यासाठी महिलांचा किमान दहा ते पंधरा महिलांचा ग्रुप करन्यास सांगितले होते. मे महिन्यामध्ये कंपनीचे कार्यालय चंदगड येथे सुरु झाले. कार्यालयामध्ये केवळ साधे रजिस्टर, एक डिजीटल फलक व कार्यालयाबाहेर एक फलक लावण्यात आला होता. सुरवातीला जेवढी रक्कम जास्त भरणार तेवढी लोनची वाढीव रक्कम मिळणार होती. आतापर्यंत 150 हून अधिक लोकांनी यामध्ये पैसे भरल्याचे समजते. कंपनीच्या चंदगड कार्यालयामध्ये काम करणारे चंदगड तालुक्यातील एक महिला व एक पुरुष कर्मचारी आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन 26 जुलै 2019 रोजी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष चंदगडमध्ये उपस्थित राहून ग्राहकांना लोन वाटप करणार होते. त्यामुळे सकाळपासूनच महिला ग्राहकांची गर्दी कार्यालयाबाहेर होती. दुपार झाली तरी कोणीही न आल्याने सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळविकर यांच्यासह अन्य लोकांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली. ग्राहकांच्या पैशाबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संबंधीतांनी मुंबई ऑफिसला भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद असल्याचे समजले. या सर्व चौकशीवरुन आपली फसवणुक झाल्याचे समजून ग्राहकांनी गोंधळ घातला. या घटनेची माहीती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी हजर झाले. लोकांचे म्हणने एकून घेतले. शेवटी कंपनीच्या दोघां कर्मचाऱ्यांना प्राथमिक चौकशीसाठी घेवून गेले. रात्री उशिरापर्यंत या दोघाकडून कंपनीविषयी माहीती घेण्याचे काम सुरु होते.
या कंपनीमध्ये पैसे भरुन लोन मिळविण्यासाठी अनेकांनी गुंतवणुक केली होती. यासाठी कोणी पतसंस्था, बँका, बचत गट, सोने तारण व हातउसणे असे पैसे उभे करुन कंपनीमध्ये भरले होते. बँका, पतसंस्था व सेवा संस्थेत लाखातील रकमेचे लोन मिळविण्यासाठी अनेक हेलपाटे खावे लागतात. सोबत कागदपत्रांचाही ससेमिरा पाठीमागे लावला जातो. मात्र या कंपनीकडून सुलभ पध्दतीने लोन मिळत असल्याने अनेकांनी यामध्ये पैसे भरले होते. ग्राहकांनी 22 हजारापासून लाखापर्यंत रक्कम भरल्याची चर्चा होती. त्यामुळे यामध्ये कोट्यावधीची फसवणुक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई येथील लाईफ लाईन इन्फोकेअर कंपनी लोकांना कर्ज वाटप करणार असल्याचे चंदगडमधील शिवसैनिकांना मे महिन्यामध्ये समजले. यावेळी चंदगड शहरातील शिवसेनेचे महादेव गावडे, विशाल गायकवाडी व शरद गावडे यांनी कंपनीच्या कार्यालयात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी तेथील वातावरण पाहून त्यांना कंपनीविषयी शंका निर्माण झाल्याने त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशन व सहाय्यक निबंधक कार्यालयात नेऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक लोक सावध झाले. नाहीतर याहून अधिक ग्राहकांची फसवणुक होण्याची शक्यता होती. काही ग्राहकांनी आज (शुक्रवारी) कंपनीची बेवसाईटही चेक केली असता ती देखील बंद झाल्याचे आढळून आल्याने संशय आणखी बळावला.
बाजारामध्ये बऱ्याच कंपनी आल्या व त्यांनी लोकांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणे असताना तरीही लोक अशा अमिषांना बळी पडतात. त्यामुळे लोकांच्यातून अशा घटनाविषयी जाणिवपूर्वक प्रशासनाने जनजागृती करवी. एखाद्या कंपनीविषयी माहीती जावून घेण्यासाठी शासनाने एखादी हेल्पलाईन सुरु करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment