एफआरपीचे तुकडे कदापिही पाडु देणार नाही - माजी खास. राजू शेट्टी, माणगाव येथे जनजागृती सभेत कारखादारांवर हल्ला..... - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2025

एफआरपीचे तुकडे कदापिही पाडु देणार नाही - माजी खास. राजू शेट्टी, माणगाव येथे जनजागृती सभेत कारखादारांवर हल्ला.....

माणगाव (ता. चंदगड) येथील सभेत बोलताना माजी खास. राजू शेट्टी, शेजारी राजेंद्र गड्याण्णावर, प्रा. दिपक पाटील व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    एफआरपीचे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपणही शेतकऱ्यांची एकजूट दाखवली पाहिजेत. अन्यथा हे संगणमताने एफआरपी चे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. सरकार व कारखानदार यांच्या या शेतकरी विरोधी भूमिकेला प्रखर विरोध करण्याची वेळ आता आली असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगुुन शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी १६ ऑक्टोबर  रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या २४ व्या ऊस परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उवस्थित रहा असे आवाहन केले.



       माणगाव येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या जनजागृती सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील पाटील होते. स्वाभिमानीचे जिल्हा संघटक प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करून आपल्या भागामध्ये हत्ती, गवा आणि रानडुकरांचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. नदीकिनारी रानडुकरांचे कळप आहेत. हुमणीसाठी ते ऊस पिकांचे नुकसान करत आहेत. त्याचा वेळीच बंदोबस्त वन खात्याने करावा. अन्यथा वाढणाऱ्या डुकरांची संख्या पाहता एक दोन वर्षात तालुक्यात शेती करणं अवघड होईल अशी भीती व्यक्त केली.

       माजी खास शेट्टी पुढे म्हणाले, ``फक्त कारखान्याच्या फायद्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर नको. शेतकऱ्यांचे हितही या तंत्रज्ञानामध्ये जपा. या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादनामध्ये वाढ झाली तर ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. पण त्याचबरोबर कारखानदाराचाही मोठा फायदा होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर या तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व वजन काटे ऑनलाइन करा. देशातील लाखो पेट्रोल पंप ऑनलाईन ने जोडले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील २०० साखर कारखाने का जोडले जाऊ शकत नाहीत. असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

         स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफ आर पी ची लढाई तर आम्ही लढलोच, पण चंदगड, आजरा गडहिंग्लज भागातील कारखानदारांनी २०२२-२३चे पन्नास रुपये देण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. ते आम्ही वसूल करूच. तसेच पूरग्रस्तांसाठी सरकारने जर प्रति टन १५ रुपये कपातीचे धोरण अवलंबले तर आम्ही त्याला विरोध करू. मुळात आपली शेती परवडणारी नाही. मग आमच्याच ताटातील तुम्ही का काढून घेता. असा सवाल स्वाभिमानीचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्ड्यांण्णावर यांनी केला. 

          यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, जानबा चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सभेला तानाजी गडकरी, उपसरपंच बाबुराव फडके, सरपंच प्रकाश वाईंगडे, मारुती अर्जुनवाडकर, के टी पाटील, कृष्णा रेगडे, पिंटू गुरव, सातू रामगावडे,  लक्ष्मण मेणसे, पांडुरंग बेनके, सतीश सबनिस, वीरुपक्ष कुंभार, विश्वनाथ पाटील उपस्थित होते. आभार गोपाळ गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment