सार्वजनिक बांधकाम विभागाला ५ हजार पोस्टकार्ड पाठवून रस्त्यावरील खड्यांची आठवण करुन दिली जाणार, चंदगड तालुक्यातून अनोखे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2025

सार्वजनिक बांधकाम विभागाला ५ हजार पोस्टकार्ड पाठवून रस्त्यावरील खड्यांची आठवण करुन दिली जाणार, चंदगड तालुक्यातून अनोखे आंदोलन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    बेळगाव - वेंगुर्ला रस्त्यावरील प्रचंड खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १३ ते १५ सप्टेंबर च्या दरम्यान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली खड्डे महोत्सवच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. तरीही प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे.

    ५००० पोस्ट कार्ड वरती लिहून त्यांना शिनोळी ते कानूर दरम्यान तुम्ही प्रवास करावा असे त्यांना आव्हान करण्यात आले आहे. कारण या खड्ड्याचे जनक आणि उद्धारक हे कार्यकारी अभियंता आणि त्यांचे सहकारी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशस्त इमारतीमध्ये बसून बेळगाव ते कानूर रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवासाचे दुःख, यातना समजणार नाहीत. हे दुःख, वेदना, यातना समजण्यासाठी शिनोळी ते कानूर रस्त्याने प्रवास केल्यानंतर यमाची मर्जी असेल तरच आपण यातून वाचाल असे पत्राने कळविले आहे. तसेच पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे गॅप यासारखे आजार या रस्तातूनच निर्माण होतात आणि गादीवरही झोप येणार नाही.

     प्रा. दिपक पाटील म्हणाले, ``सार्वजनिक बांधकाम विभागाला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत असून आता ५००० लोकांचे पोस्टकार्डद्वारे पत्र लिहिले जाणार असून पहिल्या टप्प्यात १००० लोकांची पत्रे जातील, त्यानंतर प्रत्येक आठवड्याला १००० पत्रे पाठवली जातील जेणेकरून या विभागाला  याची कायम आठवण करून दिली जाणार आहे. तसेच लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे.``यावेळी श्रीनाथ माडुळकर, महादेव तुपारे आणि नरसु पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment