चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या तळमळीतून ब्रिटिश राज्य सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यसंग्रामामध्ये आहुती देणारे शहीद भगतसिंग हे शौर्य, बलिदान आणि देश प्रेमाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन डॉ. एन. के. पाटील यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित शहीद भगतसिंग दिनानिमित्त केले.प्रारंभी प्रास्ताविक प्रा. व्ही. के. गावडे यानी करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत स्वयंसेवकांना शिस्त आणि नियोजनबद्ध कार्याचे महत्त्व पटवून दिले.
डाॅ. पाटील पुढे म्हणाले, की अवघे २३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९०७ रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील बंग या ठिकाणी झाला. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच राष्ट्रवाद आणि समाजवादाविषयीचे त्यांचे विचार विषमता, अस्पृश्यता आणि धर्मांधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी प्रेरित ठरतात. ब्रिटिश राजवटी विरोधात काम करत असताना देशातील शेतकरी-कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी नौजवान भारत सभा या संघटनेची स्थापना केली तर देशातील क्रांतिकारकांना एकत्र आणण्यासाठी हिंदू सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसाविरुद्धच्या लाहोर कटामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तर ब्रिटिश राजवटी विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि त्यांच्या दडपशाही विरोधात निषेध करण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्या बरोबर त्यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यांच्या या संघर्षासाठी ब्रिटिश राजवटीने त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा दिली. अशा या थोर हुतात्म्याचे स्मरण करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा शहीद भगतसिंग दिन म्हणून साजरा केला जातो असे डॉ. पाटील म्हणाले.राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. डी. गावडे यानी शहीद भगतसिंग यांचे जीवन कार्य हे नवीन पिढीला दिशादर्शक आहे. तरुण पिढीने शहीद भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जवळील असीम ऊर्जेचा वापर समाजसेवेसाठी करावा आणि देशाच्या सुर्जनामध्ये आपले योगदान द्यावे असे सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा रेडेकर हिने केले तर आभार अमित गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment