चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
र. भा. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “ग्रामीण विकासात सहकाराची भूमिका” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात न भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रा. सुनील बेनके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्रामीण भारताचे मूळ बळ म्हणजे सहकार. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, महिलांचे सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि गावांच्या सामाजिक परिवर्तनाचा पाया सहकारातच दडलेला आहे.”
ते पुढे म्हणाले की, ``सहकार हा केवळ आर्थिक व्यवहारांचा विषय नाही, तर तो मानवी मूल्ये आणि परस्पर विश्वासाचा प्रवाह आहे. शेतकरी, कारागीर, कामगार, महिला आणि तरुण यांना एका समान धाग्यात बांधून सामूहिक प्रगतीकडे नेणारे हे अद्भुत तत्त्वज्ञान आहे. आजच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न धावता सहकारी उद्योग, शेती प्रक्रिया संस्था, महिला बचत गट यांसारख्या उपक्रमांतून स्वावलंबी व्हावे, अशी अपेक्षा प्रा.सुनील बेनके यांनी व्यक्त केली.त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राने सहकाराची मशाल संपूर्ण देशाला दाखवली. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांसारख्या सहकारपुरुषांनी समाजाला दिलेली दिशा आजही प्रेरणादायी आहे. सहकार म्हणजे केवळ अर्थशास्त्र नव्हे, तर सामाजिक न्याय, समतेचा आणि सामूहिक विकासाचा मार्ग आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “आपला देश ग्रामीण आहे; त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रामीण विकासाशी निगडीत विषयांची जाण ठेवली पाहिजे. सहकार ही केवळ संकल्पना नसून एक संस्कृती आहे जी माणसाला एकत्र आणते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नको, तर प्रत्यक्ष जीवनाशी निगडित शिक्षण मिळावे म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आभार प्रदर्शन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. सावंत यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. एस. एन. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांनी प्रा. बेनके यांच्या विचारांचे मनापासून कौतुक करत टाळ्यांचा गजर केला.
No comments:
Post a Comment