संततधार पावसामुळे फाटकवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2019

संततधार पावसामुळे फाटकवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो

चंदगड तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे फाटकवाडी येथील प्रकल्प पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाला आहे.
चंदगड / प्रतिनिधी
गेली चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन मुख्य नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पहिल्याच पावसामध्ये फाटकवाडी येथील  प्रकल्प  शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो होत आहे.
चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात वरदान असलेला हा प्रकल्प नेहमीच पहिल्याच पावसात भरतो. चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील फाटकवाडी प्रकल्पासह जांबरे, जंगमहट्टी प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेले चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिक-ठिकाणचे ओढे, नाले यासह अन्य जलस्त्रोत प्रवाहित झाले आहेत. घटप्रभा नदीवर असलेला फाटकवाडी मध्यम प्रकल्प मागील वर्षी 26 जुन रोजी भरला होता. यावर्षी पाऊस उशिरा सुरु होऊनही दणक्यात पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात फाटकवाडी प्रकल्प ओव्हर फ्र्लो झाल्याने शेतकऱ्यांची शेतीसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत तालुक्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे फाटकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला होता. यावर्षी जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने तालुक्यातील प्रकल्प कसे भरणार हि चिंता होती. मात्र पहिल्याच पावसात फाटकवाडी प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरल्यामुळे सांडव्यातून पाणी पडले. या प्रकल्पातून चंदगड तालुक्यातील 28, गडहिंग्लज तालुक्यातील 14 गावातील शेकडो हेक्टर शेतजमिन आणि बऱ्याच गावच्या पिण्याचा पाण्यासाठी या  प्रकल्पाचा पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. निसर्गरम्य परिसर असल्यामुळे या धरणक्षेत्राला मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात.



No comments:

Post a Comment