चंदगड तालुक्यात चिखल बेंदुर उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2019

चंदगड तालुक्यात चिखल बेंदुर उत्साहात साजरा

चंदगड तालुक्यात चिखल बेंदुर सणानिमित्त बैलजोला सजवून पुजा करण्यात आली. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात महाराष्ट्र बेंदूर हा चिखल बेंदूर सण म्हणून  उत्साहात साजरा करण्यात येतो. बारा महिने तेरा काळ शेतात राब- राब राबणाऱ्या बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. काहीजण आपल्या परसात गरम पाण्याची अंघोळ घालून शिंगाना गोंडे बांधून बैलांना सजवतात . चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर असणारा तालुका म्हणून ओळखला जातो .आज शेतीमध्ये यांत्रिकीकरण आल्यामुळे बैलांची संख्या कमी होत असल्याचे दिसते .मात्र काही हौशी बैल मालकाच्या घरी आजही शेतामध्ये  काम करण्यासाठी बैल पाळले जात आहेत.
चंदगड तालुक्यात हा सण इतर ठिकाणापेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होतो कारण चंदगड तालुक्यामध्ये या सणाला मांसाहारी जेवणाचा बेत आखला जातो. आज घरोघरी मटण आणि  तांदळापासून तयार केले उंडे करून हा सण साजरा केला जातो.त्यामुळे तालुक्यात या सणाच्या निमित्ताने हजारो बक-यांची कत्तल होते. बैलांना संध्याकाळी पूजा करताना उंडे खायला देतात. चंदगड तालुक्यातील सर्व सण हे तांदळापासून तयार केलेला पदार्थ पासूनच साजरे केले जातात. चिखल बेंदूर या सणादिवशी  शेतकरी आपल्या शेती अवजारे आणि घराला पिंपळाच्या पानाचे तोरण करून बांघतो .आज शेतीची सर्व कामे बाजूला ठेवून हा सण साजरा केला जातो जून-जुलै हा भात रोप लागणीचा काळ असल्याने या लागवडीतून शेतकरी मुक्त होत असतो त्यामुळे हा सण चिखल बेंदूर म्हणून ओळखला जातो.No comments:

Post a Comment