चंदगडचे गटविकास अधिकारी यांच्या केबीनमध्ये पदवीधर शिक्षकाच्या मागणीसाठी गुडवळे ग्रामस्थांनी मांडलेला ठिय्या. |
चंदगड / प्रतिनिधी
खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून यामध्ये 43 पटसंख्या आहे. या ठिकाणचा पदवीधर शिक्षक समानीकरणामुळे अन्य शाळेत बदली होवून गेला आहे. त्यामुळे शाळेला तोच पदवीधर शिक्षक द्यावा. या मागणीसाठी खालसा गुडवळे ग्रामस्थांनी आज पंचायत समितीमध्ये येऊन गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांच्या केबीनमध्ये ठिय्या मारला. यावेळी श्री. जोशी व सभापती बबनराव देसाई यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.
मागील वर्षी या शाळेला शिक्षक न मिळाल्याने शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी बरीच मुले हेरे येथे शिक्षणासाठी गेली. परिणामी खालसा गुडवळे शाळेतील पटसंख्या कमी झाली. गुडवळे हे गाव डोंगरात असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या वर्षी बाहेर जाणारी मुले ग्रामस्थांनी थांबवून गावातील शाळेत आणली. मात्र शाळेतील पदवीधर शिक्षकाची बदली झाली. पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळेसाठी तोच पदवीधर शिक्षक द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत गुडवळे ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या केबीनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी ग्रामस्थांनी आतापर्यंत गुडवळे गावावर शिक्षणाच्या बाबतीत कसा अन्याय झाला याचा पाढाच वाचला. गटविकास अधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ग्रामस्थांनी जोपर्यंत पदवीधर शिक्षक मिळत नाही. तोपर्यंत केबीनमधून हलणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांशी बोलून ग्रामस्थांच्या भावना कळविल्या. यावेळी सभापती बबनराव देसाई यांनीही वरिष्ठांशी मोबाईलवर चर्चा केली. शेवटी ज्या पदवीधर शिक्षकाची गुडवळे येथून बदली झाली होती. तोच शिक्षक तुम्हाला तुमच्या मागणीनुसार दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. यावेळी संबंधिक शिक्षकाला बोलावून त्यांना गुडवळे येथे जाण्यास सांगितले.
No comments:
Post a Comment