चंदगड तालुक्यात आठ बंधारे, तीन पुल पुन्हा पाण्याखाली, घरांच्या पडझडीने 2 लाख 50 हजारांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2019

चंदगड तालुक्यात आठ बंधारे, तीन पुल पुन्हा पाण्याखाली, घरांच्या पडझडीने 2 लाख 50 हजारांचे नुकसान

पाटणे फाटा-मोटणवाडी मार्गावरील पाटणे (ता. चंदगड) येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
काल काहीसा जोर ओसरलेल्या पावसाने आज पुन्हा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून तालुक्यातील कानडी, गवसे, कोनेवाडी, हल्लारवाडी, माणगाव, करंजगाव, भोगोली हे आठही बंधारे व चंदगड, इब्राहिमपूर व पाटणे तीन पुल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात विविध ठिकाणी सात घरांच्या भिंतींची पडझड होवून 2 लाख 50 हजारांचे नुकसान झाले.
कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीला पुर आल्याने नदीशेजारील मंदिर अर्धे पाण्यात गेले आहे. 
चंदगड-हेरे मार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक पाटणे फाटा मार्गे वळविण्यात आली होती. मात्र या मार्गावरील पाटणे गावाजवळील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी 73.16 मिमी तर आतापर्यंत 1503.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील पारगड, इसापूर, सुंडी, तिलारी, तुडये परिसरातील सर्व धबधबे मुसळधार पावसामुळे कार्यन्वीत झाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. गुरुवारी (ता. 1) रोजी गवसे, भोगोली, माणगाव हे बंधारे व चंदगड व इब्राहिमपूर पुल वाहतुकीला खुले झाले होते. मात्र आज पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला जांबरे मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडले जात असल्याने पुर लवकर उतरत नाही. अतिवृष्टीमुळे मौजे हूंदळेवाडी येथील प्रभाकर वामनराव देसाई यांच्या घराची भिंत कोसळून 60000 चे, मौजे सुंडी येथील पांडुरंग देमाना कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 29000 रुपयांचे, मौजे सुंडी येथील येसबा येळुरनूर यांच्या घराची भिंत कोसळून 29000 रुपयांचे, मौजे सुंडी येथील मोहन तुकाराम गिरी यांच्या घराची भिंत कोसळून 39000 रुपयांचे, मौजे सुंडी येथील मारुती कल्याण गिरी यांच्या घराची भिंत कोसळून 32000 रुपयांचे, मौजे सुंडी येथील शांताबाई पांडुरंग कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 50000 रुपयांचे, मौजे माणगांव येथील गंगुबाई शिवराम कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 10000 नुकसान झाले आहे. 

No comments:

Post a Comment