मजरे कारवे येथे 44 वर्षानंतर पुराचे पाणी रस्त्यावर, काजू गोदामामध्ये पाणी घुसून लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2019

मजरे कारवे येथे 44 वर्षानंतर पुराचे पाणी रस्त्यावर, काजू गोदामामध्ये पाणी घुसून लाखोंचे नुकसान

सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांची धावपळ
बेळगाव-वेगुर्ला मार्गावर झाड पडल्याने वाहतुक तीन तास ठप्प होती. पुराचेही पाणी रस्त्यावर आले होते. 
निवृत्ती हारकारे / मजरे कारवे -प्रतिनिधी
मजरे कारवे येथे बेळगाव/ वेंगुर्ला मार्गावर 44 वर्षानंतर पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. या परिसरात असलेल्या सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील प्रापंचिक साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पुराच्या पाण्यातूनही झाड पडल्याने दुधाच्या कँनची वाहतूक करताना दूध वाहतूक ठेकेदार.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी महापूर आला होता. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने सोमवारी दुपारपर्यंत पुराची पातळी कमी झाली होती. सोमवारी दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  रात्रभर पडलेल्या पावसाने पुराची पातळी वाढली. मजरे कारवे येथील होनहाळ नाल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर दीड फूट इतके पाणी आले होते. त्याच दरम्यान भलेमोठे झाड याच ठिकाणी पडले व जवळपास तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. येथील ग्रामस्थांनी पडलेले झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. पुराच्या पाण्यातूनच वाहतूक सुरु झाली पुन्हा पावसाने सायंकाळी जोर केला तर हा रस्ताही बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भिजलेल्या काजू पोत्यांचे स्थलांतर करताना नागरिक.
येथील रमेश बामणे, शिवाजी पाटील, उत्तम हुद्दार, रघुनाथ पाटील, भागोजी दळवी, चंद्रकांत बेनके यांच्या घरात पाणी घुसले. पाण्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. रमेश बामणे यांच्या काजू फॅक्टरीत पुराचे पाणी घुसले. त्यामुळे काजू  सह मशिनरीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काजूच्या गोदामात पाणी घुसल्याने काजूच्या पोत्यांचे लाखोंचे नुकसान झाले. येथील तरुण कार्यकर्त्यांनी ती बाहेर काढून दुसऱ्या गोदामात ठेवली. म्हणून थोडेफार नुकसान होता होता वाचले आहे.
येथील सखल भागातील घरांमध्ये घुसलेले पुराचे पाणी.
                                                 केवळ दैव बलवत्तर म्हणून......... 
44 वर्षानंतर मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने येथील नागरिकांमध्ये कमालीची महापूर पहाण्याची उत्सुकता होती. मजरे कारवे सह यशवंतनगर, मुरकुटेवाडी, बसर्गे, तावरेवाडी, मौजे कारवे, गौळवाडी, मांडेदुर्ग येथील नागरिकांनी महापूर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. याचं गर्दीच्या वेळी पाणी रस्त्यावर आले होते. त्याच ठिकाणी भलेमोठे झाड रस्त्यावर पडले. केवळ दैव बलवत्तर म्हणून झाडाच्या खाली कुणी आले नव्हते व मोठी दुर्घटना टळली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दुतर्फा  वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

निवृत्ती हारकारे, कार्वे प्रतिनिधी




No comments:

Post a Comment