![]() |
ढोलगरवाडी येथील सर्प प्रदर्शनास उपस्थित सर्पप्रेमी |
कार्वे / प्रतिनिधी
बेळगाव सह उत्तर कर्नाटक, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या हजारो लोकांच्या उपस्थितीत ढोलगरवाडी येथील 54 व्या नागपंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेले सर्प प्रदर्शन संपन्न झाले. सकाळी दहा वाजता कै बाबुराव टक्केकर यांच्या समाधीचे पूजन करून या प्रदर्शनास सुरूवात करण्यात आली. असिस्टंट डायरेक्टर ऑफ ॲग्रीकल्चर गोव्याचे शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता या सर्प प्रदर्शनास प्रारंभ झाला. सकाळपासूनच येथील सर्प शाळेचे विद्यार्थी शाळेच्या आवारात उपस्थित होते. यासाठी लागणारी पूर्वतयारी रविवारी पूर्ण करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासूनच सर्प प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली होती. येथे येणाऱ्या लोकांचा उत्साह दुपारी बारानंतर अधिकच जाणवू लागला. सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या सर्प शाळेने शासनाच्या नियमांना बांधील राहून विषारी व बिनविषारी सर्प याविषयीची शास्त्रीय माहिती उपस्थितांना देण्यात आली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून या परिसरात पावसाने थैमान मांडले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. मात्र बेळगाव कडून येणाऱ्या रस्त्यावर कुठेही पाण्याची अडचण नसल्यामुळे बेळगाव आणि या परिसरातील खानापूर इत्यादी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे सर्प प्रदर्शन पाहण्यास उपस्थित होते. सुंडी येथील सवती वजर धबधबा पाहून आणि ढोलगरवाडी चे सर्प प्रदर्शन पाहून जाणारे पर्यटक तृप्त होऊन जात होते.
नाग, घोणस, पट्टेरी मण्यार, फुरसे यासारख्या विषारी व धामण, दुवड, सापटोळी, नानेटी, अजगर, हरणटोळ यासारख्या असंख्य बिनविषारी साप सापांचे यावेळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. या सर्प विद्यालयाचे सर्प शाळा विभाग प्रमुख प्रा सदाशिव पाटील यांनी विविध जातींच्या सापाबद्दल उपस्थित पर्यटकांना माहिती दिली. भितीपत्रके, पुस्तके व प्रत्यक्षात असणाऱ्या सापांबद्दल माहिती ऐकून उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यावेळी अलोट गर्दीच्या नियोजनासाठी ढोलगरवाडी ग्रामस्थांसह चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक उपस्थित होते. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱी डॉ. अरविंद पठाणे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक उपस्थित ठेवले. होते. डॉ अजयकुमार गवळी आरोग्य अधिकारी आपल्या स्टाफ सह उपस्थित होते. पाटणे वनविभागाचे वनपाल बी एस पाटील व अमोल शिंदे यांचे पथक ही या ठिकाणी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment