पुरामुळे 472 घरे पडून अडीज कोटीचे नुकसान, व्यापारीवर्ग उध्वस्त, संसार उघड्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2019

पुरामुळे 472 घरे पडून अडीज कोटीचे नुकसान, व्यापारीवर्ग उध्वस्त, संसार उघड्यावर

इसापूर रोडवर इसापूर ते चौकुळ मार्ग खचल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अतिवृष्टी झाल्यामुळे महापुर आल्याने याचा फटका कमी-अधिक प्रमाणात चंदगड तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे. त्यापैकी 30ते 32 गावातील लोकांचे घरे पडून कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे कोवाड येथील व्यापारीवर्गावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पुरात व्यापाऱ्यांचे सर्वस्व उध्वस्थ झाल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. चंदगड तालुक्यात आतापर्यंत 472 घरे पडून सुमारे 2 कोटी 44 लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तातडीची मदत म्हणून विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे व विविध स्तरातून पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु आहे. 
कोवाड (ता. चंदगड) येथे आरोग्याच्या दृष्टीकोनातून औषध फवारणी केली जात आहे. 
माणसाचा प्रश्न काहीसा सुटला असला तरी जनावारांच्या चाऱ्यांचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. वादळी वारे, अतिवृष्टी व पुरामुळे सुका चारा भिजून नुकसान झाले आहे. गेले आठ-दहा दिवस सतत पाण्याखाली राहिल्याने ओला चाराही कूजून गेल्याने जनावारांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजुला घर पडले तर दुसरीकडे केलेली संपुर्ण शेती पुरात कूजून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. केवळ माळरानावरील काही पिके तग धरली असून त्याचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांना घरात बसावे लागणार असल्याचे चित्र आहे. सर्वच स्तरातून पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु असला तरी पुरग्रस्तांना स्वत:चा हक्काचा निवारा उभे करण्यासाठी भरीव मदतीची गरज आहे. समाजातून मिळत असलेल्या मदतीवर किती दिवस स्थलांतरीत जीणे जगणार. त्यामुळे पुरग्रस्तांना आस लागली आहे ती हक्काच्या निवाऱ्यांची. 
कोनेवाडी (ता. चंदगड) येथे घर पडल्याने त्याखाली दबलेली मोटरसायल.
घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे घर बांधण्यासाठी सामान्य माणसाला कोणत्या दिव्यातून जावे लागते, याची जाणीव आहे. त्यामुळे हक्काचा निवारा मिळण्याची त्यांची मागणी आहे. वाढलेली महागाई यामुळे घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पुन्हा नव्या जोमाने घर बांधण्यासाठी सरकारी पातळीवर अशा पूरग्रस्तांना भरीव मदतीची गरज आहे. तालुक्यातील बहुत:श कुटुंबे ही शेतकरी असल्याने त्यांचे उत्पन्नही मर्यादित आहे. त्यामुळे हक्काचा घरे बांधण्यासाठी, पडलेले संसार नव्याने उभारण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याची आवश्यकता आहे. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीकाठच्या कोवाड, कुदनुर, राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक, कालकुंद्री, चिंचणे, कामेवाडी, दुंडगे, चन्नेहट्टी, निट्टूर, घुल्लेवाडी, धुमडेवाडी, नरेवाडी, दाटे, बेळेभाट, कुर्तनवाडी, कोनेवाडी, नांदवडे, आसगाव, शिरगाव, चंदगड या वीसहून अधिक गावामध्ये घर पडून नुकसान झाले आहे. कोवाडे येथे आरोग्यांच्या दृष्टीने औषध फवारणीचे व स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. इसापूर रोडवर इसापूर ते चौकुळ मार्ग खचल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. 
दुंडगे (ता. चंदगड) बंधाऱ्याचा काही भाग पुरामुळे वाहून गेला आहे. 
कोवाड येथील बाजारपेठ ताम्रपर्णी नदीकाठाला लागून आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वांधिक नुकसान हे कोवाड बाजारपेठेचे झाले आहे. गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये इतका मोठा पूर कधीही आला नव्हता. त्यामुळे लोक गाफील होते. दरवर्षी पूर येतो. मात्र यावर्षीच्या पुराची भिषणता अधिक होता. रात्रीच्या वेळी अचानकपणे पाण्याची पातळी वाढून पाणी दुकानामध्ये शिरल्याने अनेकांना दुकानातील साहित्य काढण्याचीही संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानातील साहित्य पाण्यावर तरंगताना पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दुकानातील फर्निचर साहित्यासह शिल्लक मालही पुराच्या पाण्यात बाद झाल्याने कोवाड बाजारपेठेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. घरे पडलेल्यांना सरकारी पातळीवर मदत मिळेलही. मात्र त्याचसोबत व्यापारी वर्गासाठीही वेगळ्या भरपाईची गरज व्यक्त होत आहे. जेणेकरुन पुन्हा गजबजलेली कोवाड बाजारपेठ आपल्याला पाहता येईल. सद्यस्थितीला बाजारपेठेत स्वच्छेतेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.  
तालुक्यातील पुरग्रस्तांना 5000 रुपये तातडीची मदत देण्यात आली. 
                              32 गावांतील पात्र पुरग्रस्तांना सरकारी पातळीवर तातडीची मदत...........
पुराच्या काळात ज्या पिडीतांची घरे दोन दिवस पाण्यात होती व ज्याची घरे पडून जे लोक बेघर झाले आहेत. अशा कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 32 गावातील लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली आहे. जसजसे पुढील माहीती पात्र होत आहे. त्याप्रमाणे मदतीचे वाटप केले जाणार असल्याचे तहसिलदार विनोद रणावरे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment