चंदगड नगरपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी बुधवारी अखेरच्या दिवसापर्यंत कोणीही चंदगडमधील नागरीकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या निवडणुकीला एकप्रकारे चंदगडकरांनीच स्थगिती दिल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. आता निवडणुक आयोग काय निर्णय घेतो. याकडे चंदगडकरांचे लक्ष लागले आहे. यावेळी चंदगड तहसिलदार विनोद रणावरे यांनी याबाबतचा अहवाल आयोगाकडे पाठविला आहे. आयोगाकडून पुढील आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे सांगितले. 
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा. यासाठी चंदगड ग्रामस्थांनी एकजुटीच्या जोरावर संघर्ष करत नगरपंचायतीचा दर्जा मिळविला. यासाठी आंदोलने, मोर्चा, साखळी उपोषणे व लोकांच्यातून जनजागृतीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला. नगरपंचायतीची निवडणुक विधानसभा निवडणुकीनंतर लागेल अशी अपेक्षा चंदगड शहरवासीयांना होती. मात्र 31 जुलै 2019 रोजी नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. आज (ता. 14) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मात्र चंदगडकरांनी ठरविल्याप्रमाणे चंदगड शहरासह तालुक्यात पुरस्थिती असताना आपण निवडणुकीला कसे सामोरे जायचे. त्यामुळे चंदगडकरांनी हि निवडणुक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 
दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महापूराणे थैमान घातले. अर्धा महाराष्ट्र संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत निवडणूकीला सामोरी जाण्याची मानसिकता शहरातील कोणत्याही राजकीय पक्षांत वा लोकांमध्येही नव्हती. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, यासाठी सर्व पक्षाच्या वतीने चंदगड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्यक होते. शहरातील निवडणूकी बाबत अहवाल तहसिलदारांनी आयोगाकडे पाठवला होता. मात्र कोणत्याही बदलाबाबत स्पष्टता नसल्याने अखेरीस सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये असे ठरले. त्यामुळे अखेरच्या दिवशी निर्धारित वेळेपर्यंत कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे चंदगडकरांचे लक्ष लागले आहे. 


No comments:

Post a Comment