शेतकऱ्यांनी शेतीपंप नुकसानीचे विवरणपत्र भरून देण्याचे इरिगेशन फेडरेशनचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2019

शेतकऱ्यांनी शेतीपंप नुकसानीचे विवरणपत्र भरून देण्याचे इरिगेशन फेडरेशनचे आवाहन


चंदगड / प्रतिनिधी
महापुराच्या परिस्थितीमुळे परिसरातील शेतीपंपाचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करण्यासाठी ही विवरणपत्रे इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून  सरकारकडे  सादर करण्यासाठी व नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी  विवरणपत्रे भरून द्यावीत, असे आवाहन  इरिगेशन फेडरेशनचे चंदगड तालुका समन्वयक प्रा. विजय भाई पाटील यांनी केले आहे. पुरामुळे कृषिपंप, स्टार्टर,फ्यूज, ऑटो स्वीच, खांब, पेटी, मीटर, केबल, अर्थिग वायर, पाईप लाईन यांचे नुकसान झाले आहे, याची जाणीव सरकारला नाही. त्यामुळे कृषी पंप व संबंधित साहित्यांच्या नुकसान भरपाईसाठीचा निधी सरकारने कधीही उपलब्ध करून दिलेला नाही. त्यासाठी राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी नुकतीच चर्चा करून सरकारने निधीची तरतूद करण्यासाठी अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यासाठी कृषी पंप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विवरणपत्र फॉर्म त्वरित भरून द्यावेत. त्याला वीज बिलाची झेरॉक्स प्रत जोडून चंदगड, आजरा, गडहिंग्लज  तालुका महावितरण कार्यालयात स्वतंत्रपणे किंवा एकत्रित घोषवारा विवरणपत्रे देऊन त्याची पोहोच घ्यावी. ती पोच कोल्हापूर येथे इरिगेशन फेडरेशनच्या कार्यालयात सुपूर्द करण्यासाठी पोहोच करावी. याबाबत अधिक माहीतीसाठी  रवींद्र पाटील (मजरे कारवे), प्रकाश कोल्हाळ (आंबेवाडी) यांच्याशी शेतकऱ्यांनी  संपर्क  साधावा असे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment