पुरग्रस्त कोवाड बाजारपेठेतील दुकानांचे पंचनामे पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2019

पुरग्रस्त कोवाड बाजारपेठेतील दुकानांचे पंचनामे पूर्ण

कोवाड बाजारपेठेतील पुरानंतरचे विदारक चित्र
कोवाड / प्रतिनिधी   
कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरासह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कोवाड येथील बाजारपेठेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मागील आठ ते दहा दिवस कोवाड बाजारपेठ पाण्याखाली होती. पुरामुळे नुकसान झालेल्या कोवाड बाजारपेठेतील 203 दुकानांचे पंचनामे आज सायंकाळी अखेर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या आदेशाने पूर्ण केल्याचे कोवाड बीटचे मंडल अधिकारी दयानंद पाटील व कोवाडचे तलाठी दीपक कांबळे यांनी सांगितले.
पुर ओसरल्यानंतर कोवाड बाजारपेठेतील सद्यस्थिती.
संपूर्ण जिल्ह्यासह चंदगड तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून तालुक्यातील नदीकाठी असलेल्या कोवाड बाजारपेठेला पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. सदर व्यापाऱ्यांनी काल मंडल अधिकाऱ्यांना दुकानांचे पंचनामे करण्यासाठी घेराव घातला. त्यावर दुकानांचे तात्काळ पंचनामे केले जातील असे आश्वावासन मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी माघार घेतली होती. 
कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी (संग्रहित छायाचित्र)
त्यानुसार आज कोवाड सर्कल दयानंद पाटील, तलाठी दीपक कांबळे, तुर्केवाडी तलाठी गणेश ठोसरे, कार्वे तलाठी आर. एस. पचंडी, ढेकोळी तलाठी सी. एम. पाटील आणि खालसा कोलिंद्रेचे तलाठी श्रीकांत कापसे यांनी 203 दुकानांचे पंचनामे पूर्ण केले. त्याबरोबरच उद्या पासून शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंनचामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
कोवाड बाजारपेठेतील दुकानांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. शनिवारी या मागणीचे निवेदन मंडल अधिकारी दयानंद पाटील यांना देताना कोवाडमधील दुकानदार.
शासनाकडून पूरग्रस्तांसाठी तात्काळ मंजूर झालेला निधी उपलब्ध झाला असून त्याचेही वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुराच्या पाण्याखाली गेलेली 73 कुटुंबे, पुर्णतः घरांचे नुकसान झालेली 40 कुटुंबे आणि अंशतः घरांचे नुकसान झालेली 51 कुटुंबे यांचा समावेश आहे. काल कोवाड ग्रामस्थ व व्यापाऱ्यानी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली व पंचनामे पूर्ण केल्याने व्यापाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. 


No comments:

Post a Comment