राज्यशासन पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2019

राज्यशासन पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील व इतर.
कोवाड / प्रतिनिधी
महापुरामुळे सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यशासन पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून त्यांना आर्थिक मदत करून पुन्हा या कुटुंबांना उभे करणार असा विश्वास महसूल आणि पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोवाड भागातील पूरग्रस्तांना दिला. आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोवाड, निटूर, दुंडगे व राजगोळी येथे आले असता ते बोलत होते. 

पालकमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले, ``पूरग्रस्तांनी शेतीसाठी जेवढे पिक कर्ज काढले आहे. ते सरकार व्याजासह भरणार आहे. अडीच एकरपर्यंत शेती असणाऱ्यांचे पिक कर्ज माफ केले जाणार आहे. ज्यांनी कर्ज काढले नाहीय त्या पूरग्रस्तांना तिप्पट रकमेचा लाभ दिला जाणार आहे. कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांच्या विनंतीवरुन पायी चालत जाऊन दुकानांची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधत सरकारमार्फत पूरग्रस्त व्यापारांना 50 हजार रुपये दिले जातील व भाजप पक्षाकडून वास्तव स्वरूपात मदत करण्याचे आश्वासन दिले.`` पुरकाळात नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविणे नेणे हे सरकारचे पहिले काम असल्याचे सांगून ते म्हणाले, पुरात अकडलेल्या साडेचार लाख लोकांना पुरातून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था केली. पुग्रस्त कुटुंबांना पुढील तीन महिने 20 किलो रेशन दिले जाणार आहे. सरकारने पूर्ण पडलेल्या घरांसाठी अडीच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे तत्पूर्वी सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये रोखीने दिले आहेत तर पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.``
यावेळी चंदगड तालुका भाजपा अध्यक्ष नामदेव पाटील यांनी बाजारपेठेचा सर्वे करण्याबाबत सुचविले. यावेळी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण, सरपंच अनिता भोगण, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, उपसरपंच विष्णू आढाव, प्रांताधिकारी विजय पांगारकर उपस्थित होत्या. 
पुणे विद्यापीठाच्या एनएसएस विभागामार्फतील बाराशे लोक कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीचा सर्वे करुन माहीती सादर केल्याने त्या आधारे पुन्हा पूरग्रस्तांसाठी आणखीन काही करता येईल याचा विचार केला जाईल. दुंडगे पुलाची गेल्या अनेक वर्षांपासून पडझड होत असल्याने आज गोपाळराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी हा पुल वाहतुकीला धोकादायक बनल्याचे सांगितले. यावेळी श्री. पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तात्काळ पुलाच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment