दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
प्रसारमाध्यम प्रस्तुत व दिपक गुरव लिखीत आणि दिग्दर्शित ” ही पैज प्रेमाची ” हे दोन 'अंकी मराठी विनोदी नाटक पाहण्याची संधी सिमाभागातील नाट्य रसिकांना लवकरच मिळणार आहे. कॅम्प येथील रावसाहेब गोगटे रंगमंदिर (स्कुल ऑफ कल्चर) येथे सोमवार दिनांक 5 ऑगस्टपासून 9 ऑगस्टपर्यंत सलग 5 दिवस सायंकाळी 7 वाजता या कौटुंबिक आणि हास्यप्रधान नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. बेळगावमधील स्थानिक कलाकारांचा हा एक विनोदी कलाविष्कार रसिकांना पोट धरून खळखळून हसवणारं हे नाटक नाट्य रसिकांनी आवर्जून पाहावं असं आहे. बेळगांव नगरीत तब्बल 14 वर्षांनी केवळ प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ” ही पैज प्रेमाची ” जुन्या आठवणी घेऊन नाट्य रसिकांसमोर येत आहे.
मराठी नाट्य संस्कृती जोपासण्यासाठी आणि मराठी रंगभूमीची सेवा करण्यासाठी बेळगावचे नाट्य कलाकार या नाटकाच्या व्यासपीठावर उतरले आहेत. देणगी प्रवेशिका नाममात्र 70 रुपयांना गोगटे रंगमंदिर येथे सायंकाळी 6 नंतर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नाटकात दीपक गुरव, मारुती गाडीवडर, ओमकार तमुचे, अदिती कदम,रोहन कुरबर, विशाल कडंगले या कलाकारांनी भूमिका वटविल्या आहेत. ओमकार तमुचे यांनी नेपथ्य, साईप्रसाद पाटील यांनी संगीत, अर्चना कदम यांनी वेशभूषा, मनोहर बिर्जे यांनी रंगभूषा, रमेश कदम यांनी रंगमंच व्यवस्था, अनिल घाटगे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. श्रीपाद कुडतूरकर आणि जे. के. जाधव यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. हास्याची आतिषबाजी करणारे जी एन एन सी ग्रुप प्रस्तुत ही ” पैज प्रेमाची ” हे विनोदी व हृदयस्पर्शी प्रेमाची परिसीमा असणारे नाट्य प्रत्येकांनी पाहावे असे आवाहन संयोजक रवींद्र पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment