कालकुंद्री / प्रतिनिधी
ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पोद्यान ची मान्यता पर्यावरण मंत्रालय संलग्न झू अथोरिटी ऑफ इंडिया ने दि.२८-११-२०१८ रोजी पर्यावरणविषयक निकष पूर्ण करत नसल्याच्या कारणास्तव रद्द केली होती. तथापि शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पर्यावरण मंत्रालय व झू ची मान्यता पुन्हा मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या वर्षीच्या ढोलगरवाडी नागपंचमी पंचमी उत्सवावरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे.
साठ वर्षांपूर्वी सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांनी कोणत्याही सोयी सुविधा नसताना ढोलगरवाडी सारख्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या सापांविषयीच्या समाज प्रबोधनात्मक कार्यातून त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी शिक्षण संस्थेच्या मामासाहेब लाड विद्यालयाला सर्प शाळा तथा सर्पोद्यान म्हणून लोकमान्यता मिळाली. पुढील काळात लौकिक होऊन काही वर्षांपूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या झू अथोरिटी नवी दिल्ली कडून मान्यता मिळाली. या सर्पशाळे चा उपयोग चंदगड सह कोल्हापूर, बेळगाव, गोवा परिसरातील नागरिकांच्या सर्पां विषयीच्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा याबाबत प्रबोधनासाठी होत होताच त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा या राज्यातील सर्व प्रकारच्या मेडिकल कॉलेज विद्यार्थी, पोलिस, आर्मी, डॉक्टर, सर्पमित्र यांना अभ्यासासाठी ही होत होता. तथापि सर्प शाळेचे निकष या ठिकाणी पूर्ण होत नाहीत या कारणास्तव 'झु' ने आदेश काढून सर्पोद्यान ची मान्यता रद्द केली होती. त्यामुळे वरील सर्वच अभ्यासकांवर गंडांतर आले होते तर सर्प प्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. ही मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी संस्था उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी सहा ते सात महिने अथक परिश्रम घेतले.
सर्प शाळेची मान्यता काढून घेऊ नये यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, संभाजी राजे छत्रपती, सुप्रिया सुळे, शरद पवार, कोल्हापुरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्ह्यातील सर्व आमदार, तसेच बेळगाव चे खासदार सुरेश अंगडी, प्रभाकर कोरे, गोवा राज्यातील खासदार व मंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे ढोलगरवाडी सर्पोद्यान ची मान्यता कायम ठेवून त्यांना अधिक सुविधा द्याव्यात अशी मागणी केली होती. त्याला यश आले. व झू अथोरिटी ऑफ महाराष्ट्र, नागपुर चे प्रमुख डॉ. रविकिरण गोवेकर यांनी ढोलगरवाडी (स्नेकपार्क )सर्पोद्यान ची मान्यता कायम ठेवण्याचा आदेश दिनांक १९ मार्च २०१९ रोजी पुन्हा दिला. पर्यावरण मंत्रालयाच्या निकषानुसार ढोलगरवाडी मधील सापांसाठी मोठी जागा लागणार आहे. अशा काही जागा तहसीलदार चंदगड तसेच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तानाजी वाघमारे यांनी सुचवल्या आहेत. त्याची पूर्तता झाल्यास तसेच शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यास हे सर्पोद्यान देशातील व जगातील एक आदर्श सर्पोद्यान ठरेल. त्यासाठी तालुक्यातील पर्यावरण प्रेमी व सर्व नागरिकातून जनरेटा व आर्थिक निधी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment