ढोलगरवाडी येथे नागपंचमी निमित्त सोमवारी सापांची शास्त्रीय माहीती देणार - सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2019

ढोलगरवाडी येथे नागपंचमी निमित्त सोमवारी सापांची शास्त्रीय माहीती देणार - सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील

सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील साप पकडताना.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या मामासाहेब लाड विद्यालयात सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी होणाऱ्या नागपंचमीनिमित्त सर्प प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. या सर्प प्रदर्शनावेळी विविध जातीच्या विषारी-बिनविषारी सापांची माहिती देण्यात येणार आहे. असे सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी सांगून सर्वांनी उपस्थित राहून या सर्व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
1966 साली मामासाहेब लाड विद्यालयाची स्थापना झाली व 1994 पासून सत्यशोधक वाघमारे सट्टूपा टक्केकर जुनिअर कॉलेज सुरू झाले. तेव्हापासून आजपर्यंत येथून दहावी-बारावीचे दरवर्षी दोनशे विद्यार्थी सापांची शास्त्रीय माहिती घेऊन, ज्ञान घेऊन बाहेर पडतात. त्याचबरोबर शाळेतील मुला मुलींना पोहणे, सायकलिंग, आधुनिकतेची कास धरण्यासाठी संगणक प्रशिक्षणही दिले जाते. प्रचलित अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच निसर्गाचे संवर्धन करण्याचेही शिक्षण शाळेमध्ये दिले जाते. पर्यावरणाचा भाग म्हणून शाळेच्या स्थापनेपासून विद्यालयाच्या प्रांगणात सर्प जतन करण्याचे काम केले जाते. सापांच्या बद्दल समाजामध्ये असणारी भीती व अंधश्रद्धा घालविण्यासाठी गेली 43 वर्षे शाळा कार्यरत आहे. या उपक्रमामुळे आज हजारो सर्पमित्र तयार होऊन सापांचे संवर्धन करत आहेत. या सर्पोद्यानास वन्यजीव संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, नागपुर व सेंट्रल झू अथोरिटी, दिल्ली यांची मान्यता आहे. त्यामुळे शाळेला सर्प शाळा म्हणूनही संबोधित केले जात आहे.          दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही वन खात्याच्या नियमानुसार नागपंचमीनिमित्त विषारी व बिनविषारी सापाबद्दल ची शास्त्रीय माहिती सर्वांना दिली जाणार आहे. सोमवारी 5 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment