चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील दिवाणी न्यायालयात विधी सेवा समितीच्या वतीने विनामुल्य दस्तऎवज पुनर्बांधणी सहाय्यक केंद्राचा शुभारंभ सहदिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्याय दंडाधीकारी डी. एम. गायकवाड यांच्या हस्ते झाला. मुख्य दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्याय दंडाधीकारी अमृत बिराजदर अध्यक्षस्थानी होते. यावेळी विधी सेवा समितीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते. अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर अनेकांना आपले घर गमवावे लागले आहे. पुरामुळे चंदगड तालुक्यातही अनेक घरे पडून शेतीपिकांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र सरकारी मदत मिळविण्यासाठी विविध कागदपत्रांची गरज असते. उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, सात बारा उतारा व अन्य महत्वांची कागदपत्रे. पुरामुळे घर पडून, पुराचे पाणी घरात शिरल्याने यासह व अन्य कारणामुळे कागदपत्रांची बाद झाली आहेत. अशा पुरग्रस्त नागरीकांच्यासाठी या दस्तऎवज पुनर्बांधणी सहाय्यक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून पुरग्रस्त नागरीकांनी आपल्याकडील कागदपत्रे पुरात बाद झालेली असल्यास तशी तक्रार चंदगड न्यायालयातील दस्तऎवज पुनर्बांधणी सहाय्यक केंद्रामध्ये द्यायची आहे. त्यांच्या माध्यमातून अशा नागरीकांना विनामुल्य त्यांची कागदपत्रे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विधी सेवा समिती यांच्या वतीने केले आहे. या केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बार अध्यक्ष एस. एस. पाटील, अड. अनंत कांबळे, व्ही. आर. पाटील, एल. व्ही. भातकांडे, संदिप पाटील, विजय कडुकर, सी. एस. पाटील, के. एस. सुरुतकर, रवि रेडेकर, आय. आर. दळवी आदीसह सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment