चंदगड / प्रतिनिधी
पवित्र पोर्टलद्वारे नवीन नियुक्त शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये दिले जातात. हे मानधन तुटपुंजे असून यामुळे शिक्षण सेवकांची हेळसांड होत आहे. त्यामुळे त्यांना 21 हजार इतके मानधन मिळावे अशी मागणी कोल्हापूर प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षक सेवक संघटनेने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
केंद्रसरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन 21 हजार रुपये निर्धारीत केले आहे. नवनियुक्त शिक्षण सेवकांना 2003 पासून 3 हजार रुपये व 2009 पासून 6 हजार रुपये इतके तुटपुंजे मानधन दिले जाते. शिक्षणासारख्या क्षेत्राचा विचार करता व शिक्षकावरील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जबाबदाऱ्या विचारात घेता सद्याच्या महागाईमध्ये 6 हजारांचे मानधन अपुरे आहे. सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचे किमान वेतन विचारात घेता नवीन शिक्षक सेवकांना मानधन वाढ होणे गरजेचे आहे. शिक्षण सेवकांची आर्थिक हेळसांड होवू नये. त्यांना आर्थिक स्थैर्य यावे. यासाठी 21 हजार रुपये मानधन देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष संभाजी बापट, नामदेव रेपे, साहेब शेख, दिलीप पाटील, रमेश हुद्दार, शिवाजी पाटील, राजमोहन पाटील, दस्तगीर उस्ताद, परशराम नाईक, शिक्षण सेवक संघटना अध्यक्ष शाहू पाटील यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment