शहराच्या पोषणासाठी खेड्याचे शोषण – जयंत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2019

शहराच्या पोषणासाठी खेड्याचे शोषण – जयंत पाटील

चंदगड येथे सरपंच परिषदेला मार्गदर्शन करताना राज्यध्यक्ष जयंत पाटील. शेजारी शिवाजी पाटील, सौ. राणी पाटील, श्री. भोसले व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
राजकीय लाटेमध्ये आमदार, खासदार होणे सोपे आहे. मात्र एखाद्या गावात सरपंच म्हणून निवडून येणे अवघड आहे. जात-पात बघून गावचा सरपंच निवडत नाहीत. तर काम करणारा गावच्या समस्या सोडविणारा बघून निवडून देतात. मात्र गावचा विकास शहराच्या तुलनेत आजही खुंटलेलाच आहे. खेड्यांनी वसलेल्या देशात शहरांना विकासासाठी खेड्यावरच अबलंबून रहावे लागते. शहराचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात चालल्याची खंत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जंयत पाटील (कुर्डुकर) यांनी केली. ते चंदगड येथे चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच परिषदेमध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. रमेश भोसले यांनी करुन तालुक्यातील सरपंचांच्या समस्या मांडल्या. जयंत पाटील पुढे म्हणाले, आज संघटनेच्या माध्यमातून सर्वच घटक एकत्र येत आहेत. मात्र गावगाडा हाकणारा सरपंच मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित होता. सरपंच संघटनेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करुन सरपंचांच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात राज्यातील सरपंचांना ओळखपत्र दाखविल्यास प्रवेश दिला जातो. हे कामही संघटनेच्या माध्यमातून केले आहे. सरपंच हे शोभेचे पद नाही. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सीईओ असतो. गावच्या विकासासाठी त्यांनी वेगवेगळ्या कल्पना राबवाव्यात. जी माणसे गावच्या विकासासाठी राबतात. ती माणसे गावपण टिकवितात. शहराच्या विकासासाठी जेवढा निधी शहराला दिला जातो. तेवढाच निधी गावांनाही दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई येथे सरपंच कक्ष व दिल्ली येथे सरपंच भवन बांधण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पंतप्रधानांची भेट ठरविल्याचे सांगितले.``
यावेळी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी तालुक्याच्या विकासात सरपंचांचे योगदान मोठे असते. सरपंचांनीही दुरदृष्टी ठेवून गट-तट न मानता विकासाच्या नवनव्या संकल्पना राबवाव्यात असे सांगितले. पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव प्रकाश बेलवाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमधील 370अ कलम रद्द करण्यासाठी जी शक्ती दिली ती काश्मीरमधील सरपंचांनी दिली असे सांगितले. सौ. राणी पाटील यांनी समाजाला विचाराने परिपक्व करुन भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हाडाचे कार्यकर्ते तयार करण्याचे काम भविष्यात करावे लागणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे विजयसिंह भोसले, ॲड. संतोष मळविकर, अंकुश कदम, संपदा महागांवकर, एकनाथ कांबळे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डी. जी. नाईक, सरपंच माधुरी सावंत-भोसले, शिवाजी तुपारे, सुनिल काणेकर, स्वप्नाली गवस, धोंडीबा चिमणे, राजू शिवनगेकर, आर. व्ही. ढेरे आदिसह सरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतीनीस, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रामु पार्से यांनी आभार मानले. 

केंद्र सरकारप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगाचे पैसे राज्य शासनाने ग्रामपंचायतींना द्यावेत. लोकसंख्या व क्षेत्रफळावर चौदावे वित्त आयोगाचे येणारे पैसे थांबवून सरपंचांना एक लाख रुपयांपर्यंतचे पैसे खर्च करण्याचा अधिकार द्यावा. उत्कृष्ट सरपंचांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने पुरस्कार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment