![]() |
ऊस हंगाम सुरु होण्यापूर्वी कामेवाडी (ता. चंदगड) येथील बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन देताना शेतकरी, तोडणी व वाहतुकदार. |
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये चंदगड तालुक्याला महापुराचा मोठा तडाखा बसला. या महापुराने अनेक रस्त्यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही वाहून गेले आहेत. याचा परिणाम तालुक्यातील दळणवळणावर व वाहतुकीवर होत आहे. महापुराने कामेवाडी बंधारा वाहतुकीला अयोग्य बनला आहे. ताम्रपर्णी नदीवरील कामेवाडी बंधारा अवजड वाहनांना वाहतूक करणे धोकादायक झाल्यामुळे या बंधाऱ्यावरील संपुर्ण वाहतूक बंद आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेला ऊस हंगाम पाहता कामेवाडी बंधाऱ्याचे काम वेळेत पुर्ण करण्याची मागणी शेतकरी, तोडणी व वाहतुकदारांनी तहसिलदारांना निवेदनातून केली आहे.
महापुराचा तालुक्यातील सर्वच बंधाऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात फटका बसला आहे. कामेवाडी बंधाराही त्याला अपवाद नाही. भविष्यातील ऊस हंगाम पाहता हा मार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळी खु. (हेमरस) या कारखान्याकडे व जवळच्या कर्नाटक राज्याला जाणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गाने वाहतूक करणे अतिशय अवघड झाले आहे. बंधाऱ्यावरुनच हजारो शेतकऱ्यांचा ऊस अवजड वाहने घेऊन जातात. महापुराच्या तडाख्यामुळे ऊसाच्या सुरळीमध्ये चिखल, पाणी गेल्याने ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पूरबाधित झालेला ऊस वेळेत तोडणी न केल्यास नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कारखाने ऑक्टोबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कामेवाडी बंधारा वाहतुकयोग्य न झाल्यास शेतकरी, तोडणी व वाहतुकदारांची मोठी अडचण होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना व वाहतूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. निवेदनावर रामा वांद्रे, रामू भोगण, वैजू वांद्रे, विठ्ठल कुट्रे, मारुती भोगण, मारुती भिंबर, सुधीर पाटील, युवराज पाटील, बाबु मरणहोळकर, दिलीप पाटील, अमित हारकारे, राजाराम झांबरे यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment