अतिवर्दळीच्या हलकर्णी व पाटणे फाट्यावर तिसऱ्या डोळ्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2019

अतिवर्दळीच्या हलकर्णी व पाटणे फाट्यावर तिसऱ्या डोळ्याची गरज


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी फाटा व पाटणे फाटा येथील वाढती रहदारी, वर्दळ पाहता या ठिकाणी तिसऱ्या डोळ्याची म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेराची गरज आहे. ही दोन्ही ठिकाणे चंदगड तालुक्यातील वर्दळीची ठिकाणी आहेत. वाढत्या बाजारपेठेमुळे या  ठिकाणी रोज बऱ्या-वाईट घटना घडत असतात. स्वतःच्या सुरक्षतेसाठी काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. पण सर्वसामान्य व्यापारी वर्गाचे काय? आपल्या पुरतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने मुख्य मार्गावर किवां इतरत्र काय घडते ते समजु शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी तिसऱ्या डोळयांची गरज आहे.
हलकर्णी फाटा व पाटणे फाटा परीसरात महाविद्यालय, बँका, पतसंस्था, दौलत कारखाणा, औद्योगिक वसाहत व बाजारपेठ असल्याने वर्दळ असते. त्यातच वाढत्या वाहनांची संख्या पाहता रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. कॉलेज युवकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याच्या कडेने चालताना जिव मुठीत घेऊन चालावे लागते.  त्यातच दुचाकी वाहनांच्या सायलन्ससरची पुंगळी काढुन मोठा आवाज करत वाहने सुसाट पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. लहाण-मोठे अपघात व कॉलेज तरुणांचे काही वेळा वादाचे प्रसंग ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व व्यापारी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस यंत्रणेला सर्वत्र ठिकाणी नजर ठेवण्याला मर्यादा येतात. तक्रारीनंतर पोलिसांच्याकडून कारवाई होते. त्यानंतर पु्न्हा जैसे थे परिस्थिती पहायला मिळते. त्यामुळे हया दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास पोलिस ठाण्यातुनच या सर्व गोष्टीवर लक्ष्य ठेऊन कारवाई करण्यास सोपे जाईल.या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी हलकर्णी व पाटणे फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात बसुनच अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सर्व गोष्टींवर नियत्रंण ठेवता येईल. या सर्व गोष्टीचा विचार करता पोलिस ठाण्याच्या जबाबदार घटकांनी पुढाकार घेऊन जनतेच्या सुरक्षतेसाठी दोन्ही फाटयावर तिसरा डोळा कार्यान्वीत करणे गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment