तर विधानसभेच्या निवडणुकीत बेरड-रामोशी समाजाचा उमेदवार उभा करू - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2019

तर विधानसभेच्या निवडणुकीत बेरड-रामोशी समाजाचा उमेदवार उभा करू

बेरड - रामोशी समाजाचा हलकर्णी फाट्यावर पत्रकार परिषदेत इशारा
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) पत्रकार परिषदेला उपस्थित बेरड-रामोशी समाजाचे कार्यकर्ते. 
मजरे कार्वे / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील बेरड रामोशी संघटनेच्या विविध मागण्यांकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेची हमी मिळाली नाही. तर समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करू व समाजातील सर्व वंचित घटकांना, बारा बलुतेदारांना, मागासवर्गीयांना एकत्रित करून निवडणूक जिंकू असा विश्वास हलकर्णी फाटा  येथील बेरड -रामोशी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
चंदगड तालुक्यातील विविध गावातील बेरड -रामोशी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित होते. हलकर्णी फाट्यावर पत्रकार परिषदेत बोलताना समाजाचे कार्यकर्ते रवी नाईक व भुजंग नाईक यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. भारताच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नरवीर उमाजी नाईक व छत्रपती शिवरायांच्या काळात गुप्तचर विभागात छाप पाडून स्वराज्य स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बहिर्जी नाईक यांचा आज पर्यंत सर्वच सरकारी यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना  विसर पडला आहे. त्याचीच री येथीलही लोकप्रतिनिधींनी ओढली आहे. प्रत्येक निवडणुकीत भूलथापा देऊन या समाजाचा वापर करून घेतला जातो.
चंदगड तालुक्यात १२ हजार व संपूर्ण चंदगड मतदारसंघात २२ हजार मतदान बेरड रामोशी समाजाचे आहे. गडहिंग्लज  व आजरा येथील समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन व मागासवर्गीय, बारा बलुतेदारांना एकत्रित करून ही निवडणूक लढवायची असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. पूर्वी आमच्या मागण्यांना आश्वासने देऊन प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याबाबत ही विचार विनिमय करण्यात आला आहे. कोलिक, म्हाळुंगे पासून चन्नेटी,यर्तेनहट्टी पर्यंत बेरड रामोशी समाज विखुरलेला आहे. चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस विष्णू नाईक, युवराज नाईक, जोतिबा नाईक, पांडू नाईक, दत्तू नाईक, अप्पाजी नाईक, सिताराम नाईक, रामचंद्र चिंचणगी, आप्पा चाळुचे, विलास नाईक, अमोल नाईक यांच्यासह समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment