चंदगड / प्रतिनिधी
कलिवडे (ता. चंदगड) पैकी धनगरवाडा येथील सौ. सुनिता धाऊ जानकर (वय-35) या आपल्या घरापाठीमागील मोकळ्या जागेतील गवत कापण्यासाठी गेल्या असता अस्वल व दोन पिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता हि घटना घडली.
सौ. जानकर यांच्यावर अस्वलाने हल्ला करुन चेहऱ्यावर, खांद्यावर, छातीवर, पोटावर नखांनी ओरबडले असून मांडीचा चावा घेतला आहे. अस्वलाच्या हल्यातून स्वत:ची सुटका करुन घेत असताना सौ. जानकर यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होवून हाड मोडले. हि माहीती वनविभागाला मिळताच घटनास्थळी भेट देवून वनविभागाच्या चारचाकी वाहनाने त्यांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील हत्तरकी रुग्णांलयात दाखल केले आहे. दरम्यान आज वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बाळासाहेब भांडकोळी यांनी गडहिंग्लज येथील हत्तरकी रुग्णांलयात जखमी सौ. जानकर यांची भेट घेवून चौकशी केली असता जखमी सौ. जानकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने दोन-तीन दिवसात त्यांच्या खाद्याची शस्त्रक्रिया करणार आहे. सौ. जानकर यांना वनविभागाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सरकारी नियमाप्रमाणे त्यांना सरकारी मदत मिळवून देणार असल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले. याकामी ग्रामस्थांसह वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक रावळेवाड, वनकर्मचारी विश्वनाथ नार्वेकर, भागोजी शेळके व कृष्णा पोवार यांनी सहकार्य केले.
नागरीकांना सतर्कतेचे आवाहन - वनक्षेत्रपाल श्री. पाटील
अस्वले शेणाच्या गायरीवरील किडे व वाळवी खाण्यासाठी वनेत्तर क्षेत्रात येत असून ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी. आपल्या परिसरात जंगली प्राणी आढळून आल्यास वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी नागरीकांना केले आहे.
No comments:
Post a Comment