चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गडहिंग्लजला – प्रांताधिकारी पांगारकर - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2019

चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गडहिंग्लजला – प्रांताधिकारी पांगारकर

चंदगड येथे आचारसंहितेबाबत मार्गदर्शन, पत्रकार परिषदेत माहीती
चंदगड येथील तहसिल कार्यालयात आचारसंहितेबाबत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, शरद मगर, दिनेश पारगे, आर. बी. जोशी, पो. नि. अशोक सातपुते आदी. 
चंदगड / प्रतिनिधी
निवडणुक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगून चंदगड विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापासून चिन्ह वाटपापर्यंत सर्व प्रक्रिया चंदगड येथे होणार आहे. त्यापुढील मतदान यंत्रम वाटप यासह मतमोजणी गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये होणार असल्याची माहीती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. चंदगड येथील तहसिल कार्यालयात निवडणुक आचारसंहितेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. 
प्रांताधिकारी पांगारकर पुढे म्हणाल्या, `` मतदारसंघासाठी निवडणुक काळात सहा भरारी पथके, चौदा स्थिर निरिक्षण पथके, व्हीडीओ सर्वेक्षण पथके आठ व पडताळणी पथके दोन यासह 58 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर, 9, 10 व 15 आक्टोबरला या निवडणुक यंत्रणेत कार्यकत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण गडहिंग्लज येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेरील 15 केंद्रासाठी पोलिसांसारखी वायरलेस यंत्रणा वापरण्यात येणार आहे. चंदगड येथे प्रशस्त हॉल नसल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये करण्यात येणार आहे. याच ठिकाणी स्ट्रॅागरुम, मतमोजणी नंतर पेट्या ठेवण्याची सोय एम. आर. हायस्कुलच्या हॉलमध्ये करण्यात आली आहे. 
महापुरामुळे पुराचे पाणी घरात शिरून मतदान ओळखपत्र खराब व हरविलेल्या 48 मतदारांना त्यांच्या मागणीनुसार विनाशुल्क नवीन मतदान कार्ड देण्यात आली आहेत. अजूनही कोणाची मतदान कार्ड पुरात पाण्यात खराब झाली असतील तर त्यांना तहसिल कार्यालयाच्या निवडणुक विभागाशी संपर्क साधावे असे आवाहन केले आहे. एक खिडकी परवाना कक्ष योजना उमेदवारांच्यासाठी तहसिल कार्यालयात सुरु करुन याच ठिकाणी उमेदवारांना सर्व माहीती पुरविली जाणार आहे. दरम्यान राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते यांनाही यावेळी आचारसंहिते संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विनोद रणवरे, शरद मगर, दिनेश पारगे, आर. बी. जोशी, पो. नि. अशोक सातपुते हे प्रमुख उपस्थित होते. 
चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 594 पुरुष, 1 लाख 59 हजार 316 स्त्री मतदार तर एकूण 3 लाख 18 हजार 913 मतदार आहेत. मतदारसंघातील 376 मतदान केंद्रावर 260 इमारतीमध्ये मतदान होईल. यामध्ये चंदगड तालुक्यात 196 केंद्रावर 78 हजार 538 पुरुष तर 76 हजार 302 व तृतीयपंथी एक असे एकूण एक लाख 54 हजार 841 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गडहिंग्लज तालुक्यात 138 मतदान केंद्रावर 65 हजार 174 पुरुष, 65 हजार 636 महिला व एक तृतीयपंथी असे एकुण 1 लाख 8 हजार 11 मतदार आहेत. तर आजरा तालुक्यामध्ये 15 हजार 882 पुरुष, 17 हजार 378 यासह तृतीयपंथी एक असे एकूण 33 हजार 261 मतदार मतदार आहेत. 2 हजार 676 अपंग मतदार असून त्यांच्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. 

No comments:

Post a Comment