कालकुंद्री / प्रतिनिधी
चंदगड चंदगड आगाराच्या आडमुठे धोरणामुळे गेल्या दीड महिन्यापासून आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारी कोल्हापुर दड्डी मार्गे कोवाड बंद आहे. आगार व्यवस्थापक यांनी दड्डी पुलावरील धोकादायक रस्त्याचे कारण पुढे केले असले तरी यात काही तथ्य नाही. असा आरोप करत चार दिवसात बस सुरू झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मार्गावरील प्रवासी व ग्रामपंचायतींनी दिला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे घटप्रभा नदीवरील पुलावरील रस्त्याच्या कॉंक्रिटचा किरकोळ भाग तुटून गेला होता. तथापि त्यानंतर वाहतुकीसाठी या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता सर्व वाहनांसाठी वाहतूक योग्य केला आहे. येथून गेल्या महिनाभरापासून अति अवजड वाळू भरलेल्या ट्रक सह सर्वच वाहने बिनदिक्कत जाताहेत असे असताना केवळ एसटी वाहतूक का होत नाही? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून होत आहे. रात्री कोवाड मुक्काम ला येऊन सकाळी सव्वा सहा वाजता कागणी, कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द, दड्डी, हत्तरगी मार्गे कोल्हापूर ला जाणारी बस गेल्या आठ-दहा दिवसांपासून कुदनुर मुक्कामी करण्यात आली आहे. ही बस सकाळी कालकुंद्री, कोवाड, नेसरी, गडिंग्लज मार्गे कोल्हापूर कडे जात आहे. यामुळे मार्गावरील तळगुळी, राजगोळी बुद्रुक व खूर्द, कामेवाडी आदी दहा-बारा गावातील प्रवासी वंचित राहत असून इतर गावातील प्रवाशांनाही ज्यादा तिकिटाचा भुर्दंड बसत आहे. याचा सारासार विचार करून आगार व्यवस्थापक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रिज सार्थ ठरवण्यासाठी कोवाड दड्डी मार्गे कोल्हापूर बस तात्काळ पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment