दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये गेल्या तीन वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देऊन जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने घेतली आहे. गावातील सुंदर तलाव, नदी, नाले वाचविण्यासाठी पालकांचे सहकार्य वाढत आहे.
चंदगड तालुका निसर्गरम्य असून या तालुक्यामध्ये अनेक कृत्रिम तलाव आहेत. गेल्या काही वर्षामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होत आहेत. लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश या शाळेतील विद्यार्थी देत आहेत. यावर्षी शाळेच्या जलकुंडात जवळपास दोनशे गणेश मूर्तिचे विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टनभर निर्माल्य जमा केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विसर्जनातून चॉकपिट तयार होते. याचा उपयोग शाळा वर्षभर खो- खो, कब्बडी मैदान आखण्यासाठी करते. विसर्जनामधून तयार झालेले खत गावातील शेतकरी शेतीसाठी वापरतात. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव ही शैक्षणिक संस्था नेहमीच समाजातील वाईट रूढी परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांकरवी करत आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील, सचिव श्री. ओऊळकर, सहसचिव प्रा. विक्रम पाटील, समता प्रतिष्ठाणचे डॉ. प्रदिप देवण यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment