चंदगड मतदारसंघात चुरशीने 68.04 टक्के मतदान, सकाळी महिलांच्यामध्ये मतदानासाठी गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2019

चंदगड मतदारसंघात चुरशीने 68.04 टक्के मतदान, सकाळी महिलांच्यामध्ये मतदानासाठी गर्दी

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महिला हात उंचावून मतदानाची निशानी दाखविताना. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाच्या दिवशी चुरशीने 68.04 मतदारसंघात मतदान झाले. पाऊस येणार अशी शक्यता असतानाही पाऊसाने उघडिप दिल्याने सकाळच्या सत्रात महिलांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चंदगड मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 271 चंदगड विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 11 या वेळेत 20 टक्के मतदान झालेले आहे.चंदगड तालुक्यात 196 मतदान केंद्रावर मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत 53.21 टक्के, पाच वाजेपर्यंत 65.04 टक्के मतदान झाले आहे. चंदगड मतदारसंघात आज 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. प्रत्येक उमेदवार आपणच निवडून येणार असे सांगत असला तरी यामध्ये कोण बाजी मारणार हे 24 ऑक्टोबर 2019 रोजी होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 
बुझवडे येथे मतदानासाठी लागलेली लांबच-लांब रांग. 
पावसाच्या भितीने महिला सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्या. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी जाणवत होती. काही महिला आपल्या गल्लीतील कामे अद्याप अपूर्ण असल्याने आम्ही मतदानाचा हक्क बजावणार नसल्याची भूमिका घेतल्याने उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढून त्यांना मतदान करण्यास सांगितले. नव मतदारांच्यामध्ये मतदान करण्यापूर्वीच कमालीची उत्सुकता जाणवत होती. मतदान करुन आल्यानंतर आपापल्या मित्रांना बोट उंचावून बोटावरील शाई दाखवत होते. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 
नागनवाडी (ता. चंदगड) येथे मतदान केल्यानंतर पारावर गप्पा मारताना ग्रामस्थ.
दरम्यान उमेदवार शिवाजी पाटील यांच्यासह माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी मतदान केंद्रांना भेटी देवून परिस्थितीची माहीती घेतली. तर राजेश पाटील, संग्राम कुपेकर, अप्पी पाटील, रमेश रेडेकर, अशोक चराटी, अनिरुध्द रेडेकर, महेश पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनी मतदान केंद्रांना भेटी देवून मतदानाची माहीती घेतली. 
कोवाड (ता. चंदगड) येथे जेष्ठ नागरीक महिलांनीही मतदानाचा हक्क बजावला. 
उमेदवाराच्या पक्षांच्या कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान करण्यासाठी आपल्या मर्जीतील लोकांना प्रवृत्त करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन काल रात्रीपासून करण्यात आले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते टेबल लावून मतदार यादीतील नाव मतदारांना शोधून देण्यास मदत करत होते. सकाळच्या सत्रात थंडा तर दुपारी कडक उन्हातही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या उन्हात कोणतेही काम होत नसल्याने मतदारांनी मतदान करुन शेतीच्या कामाकडे जाणे पसंद केले. त्यामुळे दुपारच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती.No comments:

Post a Comment