लोकशाही बळकटीकरणासाठी शंभर टक्के मतदान करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2019

लोकशाही बळकटीकरणासाठी शंभर टक्के मतदान करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर / प्रतिनिधी
मतदान प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी केले.
मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावांची खात्री www.nvsp.in या संकेतस्थळावर भेट देवून किंवा ओटर ॲपद्वारे करता येईल. मतदान झाल्यानंतर आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला गेले आहे का याची खात्री व्हीव्हीपॅट मशिनद्वारे करता येईल. जर एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कार्ड, खासदार,आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड अशा कोणतेही एक पर्यायी ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येईल.
उद्या होणाऱ्या मतदानादिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर, दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक सुविधा, निवडक शाळांमध्ये सहायकारी मतदान केंद्र आणि स्वयंसेवक यांची सोय केली आहे. अंध तथा दुर्बल मतदारांसोबत सहचाऱ्यास परवानगी असणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य, अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्र त्याचबरोबर इव्हीएम यंत्रावर ब्रेललिपीची सुविधा, पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मतदान केंद्रामध्ये प्रत्येक पुरुष मतदारामागे दोन महिला मतदारांना प्रवेश देण्याची सुविधा, विशिष्ठ ठिकाणी फक्त महिला संचलित मतदान केंद्र, छायाचित्र मतदान पावती प्रत्येक मतदारास दिली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार मदत केंद्राची व्यवस्था, मतदान केंद्रांवर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालय यांची सुविधा, मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक, सुलभ प्रवेशासाठी मतदार पावती अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उद्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment