नागवे-खळणेकरवाडी परिसरात हत्तींच्या कळपाकडून धुमाकुळ, ऊसासह भातपिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2019

नागवे-खळणेकरवाडी परिसरात हत्तींच्या कळपाकडून धुमाकुळ, ऊसासह भातपिकांचे नुकसान

नागवे (ता. चंदगड) परिसरात हत्तींच्या कळपाने केलेले ऊसपिकांचे नुकसान.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील नागवे-खळणेकरवाडी येथील परिसरातील `भट्टीचा लंबर` या शेतात बुधवारी रात्री हत्तींच्या कळपाने धुमाकुळ घालत ऊसासह भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हातातोंडाशी आलेली पिके जंगली प्राण्याकडून जमीनदोस्त केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 
यावर्षी चंदगड तालुक्यात महापुराने घातलेल्या थैमानात घरासह शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या महापुराच्या तडाख्यातून वाचलेली पिके जंगली प्राण्यांकडून जमीनदोस्त केली जात आहेत. या परिसरात हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी जीवाच्या भितीने शेतीकडे जाणे सोडून दिले आहे. शेतीकडे जायचे झाल्यास गटा-गटाने जावे लागते. हत्तींच्या या वावरामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. 
नागवे-खळणेकरवाडी परिसरात हत्तींच्या कळपाने भातपिकांमध्ये धुडघुस घातल्याने भात पडून नुकसान झाले. 
नागवे-खळणेकरवाडी परसिरातील गुंडू गुरव, मायाना गुरव, सोपान म्हाडगुत, रामा खळनेकर, रामदास म्हाडगुत यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तींच्या कळप कापणीला आलेल्या भातपिकांतून गेल्याने भाताचे दाणे जमिनीवर पडून उभे पिक जमीनदोस्त झाले आहे. ऊसाच्या फडात जाऊन धुडघूस घातल्याने ऊस मोडून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळाल्यानंतर ओम साई आघाडीचे अध्यक्ष संभाजीराव देसाई, शेतकरी संतोष गुरव, रामदास म्हाडगुत, रामा खळणेकर, सोपान म्हाडगुत यांनी घटनस्थळी भेट देवून वनविभागाच्या चंदगड कार्यालयाला याबाबत कळविले.  वनविभागाने या हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी व नुकसानीचे पंचनामे करुन बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment