वाघोत्रे परिसरात टस्कराचे आगमन, बैलगाडी व पिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2019

वाघोत्रे परिसरात टस्कराचे आगमन, बैलगाडी व पिकांचे नुकसान

इसापूर (ता. चंदगड) येथे जंगलात वावरत असलेला टस्कर.
चंदगड / प्रतिनिधी
गुडवळे, वाघोत्रे, मिरवेल, इसापूर परिसरात टस्कराचा वावर असून या परिसरातील भात, ऊस, नाचना पिकांचे व केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरु आहे. महापुरातून वाचलेली पिके आता पोसवण्याच्या (पोटरीला) तयारीत आहेत. याच कालावधीत नेहमीप्रमाणे चंदगड तालुक्यात आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कर्नाटकातून खानापूर, गोल्याळी, तुडिये, कोलीक, म्हाळुंगे या परिसरातून हत्तीने कोकणात प्रवेश करुन काल रात्री वाघोत्रे येथील किदंळतळे याकडे आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी पाणी व चारा मुबलक प्रमाणात असल्याने टस्कराचा मुक्कामही येथे आहे. किदंळतळे येथील महादेव पवार यांची बैलगाडी व भात व रमेश शिंदे व राजाराम घुमे भात व नाचना या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. टस्कराचे आगमन झाल्याने हातातोंडाशी पिके कशी वाचवायची या विंवचनेत बळीराजा आहे. वनविभागाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई बाजारभावाप्रमाणे त्वरीत द्यावी व हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी पारगडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रघुवीर शेलार व इसापूरच्या सरपंच स्वप्नाली गवस यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment