जगातील सर्वात मोठा शोध म्हणजे पुस्तक निर्मिती - प्रा. मायाप्पा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2019

जगातील सर्वात मोठा शोध म्हणजे पुस्तक निर्मिती - प्रा. मायाप्पा पाटील

कालकुंद्री वाचनालय व्याख्यानमाला
कालकुंद्री येथे व्याख्यानमालेत बोलताना ज्योती महाविद्यालय बेळगाव चे प्रा. मायाप्पा पाटील, सोबत प्रा जॉर्ज क्रुझ, विलास कोकितकर आदी.
कालकुंद्री / प्रतिनिधी
पुस्तके माणसे घडवतात, माणसाचे मस्तक घडवतात, पुस्तके मोठी स्वप्ने दाखवतात आणि ते अमलात आणण्याची ताकत ही देतात. म्हणून जगातील सर्वात मोठा शोध म्हणजे पुस्तक निर्मिती! असे प्रतिपादन बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयाचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी केले. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथे ज्ञानदीप वाचनालय आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना 'वाचूया घडूया' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी विलास ल. कोकितकर होते.
  स्वागत के. जे. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. शिव पुतळ्याचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुढे बोलताना प्रा. मायाप्पा पाटील म्हणाले महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, रघुनाथ माशेलकर, मनमोहन सिंग यांच्यासह देश-विदेशातील तील अनेक महान व्यक्ती पुस्तक वाचनामुळेच मोठ्या झाल्या आहेत.बुद्ध चरित्र हे पहिले पुस्तक हाती  पडल्यामुळेच आंबेडकर घडले. मोठे व्हायचे असेल तर  राजर्षी शाहू, महात्मा फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा व्यक्तींची चरित्रे वाचा. पुस्तके वाचणारी माणसे धाडशी बनतात. खांद्याचा खालचा भाग व्यायाम शाळेमुळे सशक्त बनतो तर वरचा भाग सशक्त करण्यासाठी वाचनालयात गेले पाहिजे.हे दोन्ही भाग सशक्त असतील तरच देश सुद्धा सशक्त बनेल म्हणून वाचनालयांना विद्यापीठे बनवा असा संदेश त्यांनी विद्यार्थी व तरुणांना दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजयश्री अकॅडमी कोल्हापूर चे संचालक व कालकुंद्री गावचे सुपुत्र जॉर्ज क्रूज यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबुराव पाटील, वाचनालयाचे संचालक वंदना पाटील, शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील,  विलास शेठजी आदींची उपस्थिती होती, सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले.आभार  पी. एस. कडोलकर यांनी मानले. 

No comments:

Post a Comment