`हत्ती हटाव, शेती बचाव` यासाठी गुडवळे ग्रामस्थांची तहसिल, वनविभागावर धडक - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2019

`हत्ती हटाव, शेती बचाव` यासाठी गुडवळे ग्रामस्थांची तहसिल, वनविभागावर धडक

खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी हत्ती हटावसाठी वनविभागावर मोर्चा काढून ठिया आंदोलन केले. 
चंदगड / प्रतिनिधी
जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी उध्वस्थ होत आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील  ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. तहसिलदारांना निवेदन देवून ग्रामस्थांनी आपला मोर्चा हंबेरे (ता. चंदगड) येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे वळविला. वनकार्यालयावर मोर्चा नेत कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत जिल्हा उपवनसंरक्षक येऊन हत्ती हटावबाबत ठोस उपाययोजनेचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयाच्या दारातून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. अखेर जिल्हा वनसंरक्षक अधिकाऱ्यांशी चर्चा करुन येत्या चार ते पाच दिवसात प्रत्यक्ष भेटीचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले.

गुडवळे ग्रामस्थ ट्रॅक्टर, दुचाकी व चारचाकी गाड्यावरुन चंदगडमध्ये दुपारी दाखल झाले. थेट तहसिल कार्यालयावर जाऊन आपली कैफीयत मांडली. यावेळी तेथे आलेले माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी लोकांचे सात्वन केले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी केली. ग्रामस्थ चंदगडच्या संभाजी चौकातून बाजारपेठमार्गे हंबेरे येथील वनविभागाच्या कार्यालयावर गेले. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. येथे त्यांनी आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जोपर्यंत जिल्हाचे उप वन संरक्षक येत नाहीत. तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका घेतली. यावर चंदगड विभागाचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. यावेळी त्यांनी चार ते पाच दिवसात प्रत्यक्ष ग्रामस्थांना भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले. 

संतप्त गुडवळे ग्रामस्थांनी जोपर्यंत उपवनसरक्षक आपल्या भेटीसाठी येत नाहीत, तोपर्यंत वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी गुडवळे विभागात फिरकु नये, अन्यथा होणाऱ्या परिमाणांना तुम्हीच जबाबदार असाल अशा इशारा गुडवळे ग्रामस्थांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment