दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत धनगर वाड्यांंवर 'आनंदाची दिवाळी', ग्रामस्थांना फराळ, चादरी, स्वेटरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2019

दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत धनगर वाड्यांंवर 'आनंदाची दिवाळी', ग्रामस्थांना फराळ, चादरी, स्वेटरचे वाटप

धनगर वाड्यावरील मुले व ग्रामस्थांना आनंदाची दिवाळी उपक्रमांतर्गत साहित्य वाटप करताना दुर्गवीर प्रतिष्ठान चे स्वयंसेवक व वनविभागाचे अधिकारी व मान्यवर.
कालकु्ंद्री / प्रतिनिधी 
दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने  स्वयंसेकांनी तालुक्यातील पार्ले व बांद्राई धनगरवाड्या वर जाऊन तेथील विद्यार्थी व ग्रामस्थांना दिवाळीचा फराळ, चादरी व अंगणवाडी ते प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन 'आनंदाची दिवाळी' उपक्रम साजरा केला. वनविभाग पाटणे परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डी. एच. पाटील व मान्यवरांच्या हस्ते मुलांना व ग्रामस्थांना साहित्य वाटप करण्यात आले.
दुर्गवीर संस्थेचे तालुका संघटक अनिल केसरकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या गेल्या १४ वर्षातील गड संवर्धन उपक्रम व्याप्ती व  निष्पत्ती चा आढावा घेताना 'आनंदाची दिवाळी'  या उपक्रमाबद्दल  माहिती दिली. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तरुणांनी दुर्गवीर च्या गडसंवर्धन चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल पाटील म्हणाले महाराष्ट्रातील डोंगर-दर्‍या जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या धनगर बांधवांचे सामाजिक प्रबोधन होण्याची गरज आज आहे. दुर्गवीर संस्थेच्या स्वयंसेवकांचे कौतुक करताना ते म्हणाले, ``शिवजयंतीला एकदिवस डाॅल्बीवर थिरकणारे तरुण  ही पाहिले मात्र सर्वसामान्य कुटूंबातील लहान-मोठे नोकरी-व्यवसाय  करत दुर्गवीरचे कार्य करणारे स्वयंसेवक व संस्थेचे कार्य पाहून भारावून गेलो आहे.``संस्थेचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी या उपक्रमात लोकसहभाग तसेच कार्यकर्त्यांच्या वाढीची अपेक्षा व्यक्त केली. गत १४ वर्षात नाशिक पासून गडचिरोली ते कोल्हापूर कोकण या भागात संस्थेचे कार्य चाललेले आहे. याला महाराष्ट्रासह कर्नाटकातील स्वयंसेवकांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले .
यावेळी वनक्षेत्रपाल पाटील यांच्या हस्ते बेळगाव व चंदगड परीसरातील कार्यरत स्वयंसेवक व मान्यवरांना संस्थेचे मुंबई सहकार्यवाह मिथिलेश जाधव यांच्या वतीने स्मृती चिन्हे प्रदान करण्यात आली.कार्यक्रमास केंद्र शाळा पार्लेचे मुख्याध्यापक अनिल पाटील ,शिक्षक सचिन पिटूक ,पोलीस पाटील सखाराम फोंडे ,संस्कृती हसुरकर ,आकांक्षा तोडकर, वनपाल बी. आर. भांडकोळी ,सुनील नागवेकर दुर्गवीर चे कार्यवाह अजित पाटील, सागर मुतकेकर , नरेश जाधव, विठ्ठल बामणे, पुंडलिक भांबर,अवधूत यडूरकर,विजयराज टेंबूकडे,प्रतिक पाटील, सुनिल कोकीतकर, तसेच दोन्ही वाडयावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यास अजित राणे, संदीप गावडे, टी.एल.गावडे आदींनी परिश्रम घेतले.

वस्तीवरील वाटपा नंतर सह्याद्रीच्या साक्षीने व कुशीत वनक्षेत्रपाल पाटील यांच्या हस्ते बेळगाव व चंदगड परीसरातील कार्यरत स्वयंसेवकाना तसेच मान्वराना संस्थेचे मुंबई सहकार्यवाह मिथिलेश जाधव यांच्या वतीने दिलेली स्मृती चिन्हे प्रदान करण्यात आली आणि श्रमलेल्यांच्या चेहेर्यावर कृतार्थ भाव दाटून आले.




No comments:

Post a Comment