![]() |
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे वाढत्या व्यावसायीकरणामुळे वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्कीगचा प्रश्न गंभीर बनत आहे. |
चंदगड तालुक्याच्या मध्यभागी असलेला व झपाट्याने विकसित होत असलेल्या पाटणे फाटा आज पार्किंगच्या समस्येने हैराण झाला आहे. दक्षिणेला तिलारी पासून व उत्तरेला कोवाड पासून जवळपास या भागातील सर्वच नागरिक व्यवसायानिमित्त पाटणे फाट्यावर येत असतात. येथील वाढते व्यवसाय याची साक्ष आहेत. सध्या या फाट्यावर भाजीपाला विक्रेते त्याचबरोबर किराणा, कपड्यांचे व्यापारी यांची अनेक दुकाने सध्या चालू स्थितीत आहेत. या फाट्याच्या परिसरातील पंधरा-वीस गावाचे नागरिक खरेदीसाठी या फाट्यावर येत असतात.
सध्या चंदगड तालुक्यात चार चाकी गाडी घेऊन फिरण्याचे प्रस्थ वाढले आहे. सायंकाळच्या वेळी सर्रास खरेदीच्या निमित्ताने नागरिक दुसरे का नाही घराबाहेर पडतात, आणि पाटणे फाटा जवळ करतात. या वाढत्या वाहनांमुळे येथील पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. तिलारी पासून आलेला रोड व कोवाड पासून आलेला रोड हे जवळपासच असल्यामुळे दोन्ही बाजूची आलेली वाहने, उदाहरणार्थ एसटी बसेस त्याचबरोबर चंदगड,बेळगाव या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीचा ताण विचारात घेता या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. एखाद दुसरी एसटी समोरासमोर येऊन थांबल्यास त्याचा फटका इतर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा या खरेदीदारांच्या गाड्यांचे पार्किंग केल्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहतुकीस मर्यादा येत आहेत. पाटणे फाटा येथे पोलिस चौकी आहे. सध्या गेले कित्येक दिवस ही चौकी बंद अवस्थेतच आहे. विचारणा केल्यास अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पोलीस चौकीत कर्मचारी नसल्याचे त्रोटक उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे.
या फाट्यावर हलकर्णी एमआयडीसी, आयटीआय कॉलेज, व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालय, गोकुळ दूध संघाचे तावरेवाडी शीतकरण केंद्र आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. पाटणे फाटा हे चंदगड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कुठल्याही पक्षाचे अगर कोणत्याही कारणाने होत असलेल्या आंदोलनाचे प्रमुख ठिकाण म्हणून याकडे पाहिले जाते. अगोदरच त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी, पार्किंगची समस्या गंभीर होत असताना अशी आंदोलने आणि सणावाराची खरेदी असेल तर इथून प्रवास करणेही प्रवाशांच्या दृष्टीने मुश्कील बनले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासना मार्फत त्याठिकाणी पार्कींग किंवा अनावश्यक थांबत असलेल्या गाड्या बंद केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. प्रशासनाने यात लक्ष घालून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment