आसगाव सजातील कर्मचाऱ्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2019

आसगाव सजातील कर्मचाऱ्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

आसगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आसगाव सजातील कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ. 
चंदगड / प्रतिनिधी
आसगाव (ता. चंदगड)  सज्जातील प्रभारी कोतवाल  प्रकाश मारूती पाटोळे  यांनी ग्रामस्थांना   अंधारात ठेवून स्वार्थासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी योजनांचा लाभ उठवला आहे. त्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. 
तीन महिन्यापुर्वी झालेल्या अतिवृष्टीने आसगाव येथील बरीच रहाती घरे जमिनदोस्त झाली. या पडलेल्या घरांचे पंचनामे गावकामगार तलाठी यांनी प्रत्यक्ष पहाणी न करता कोतवाल प्रकाश मारुती पाटोळे याच्याकडून माहिती घेऊन केले. प्रत्यक्षात भिंती पडून मोठे नुकसान झाले असताना किरकोळ पडझड दाखविल्यामुळे व काही घरांचे पंचनामे केलेच नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळू शकत नाही. याला जबाबदार कोतवाल असून त्याने स्वतःचे कुमकुवत घर असून पंचनामा करताना घर पूर्ण जमिनदोस्त झाल्याचा केला आहे. यातून सरकारची फसवणूक केली आहे. प्रकाश पाटोळे याने तीन वर्षापूर्वी राजीव गांधी इंदिरा आवास योजनेंतर्गत घर बांधून घेतले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वार्थ साधत आहे. अशा प्रभारी कोतवाल यांच्यावर  व त्याला मदत करणार्या  संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई  करावी. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी गावडे, महादेव गावडे, गुंडू गावडे, महादेव गावडे, विठोबा गावडे, भगवान हळवणकर, अर्जुन गावडे आदी ग्रामस्थांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment