कार्वेत मुख्याध्यापकांचे 'तंबाखूमुक्त शाळा' प्रशिक्षण
कालकुंद्री / प्रतिनिधी
![]() |
कार्वे (ता. चंदगड) येथे तंबाखू मुक्त शाळा अभियान मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना संजय ठाणगे, सोबत शशिकांत सुतार, दशरथ सूर्यवंशी, चौधरी, के आय पाटील, निटुरकर. |
देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे रोज अडीज हजार लोक मृत्युमुखी पडतात. प्राथमिक व माध्यमिक शाळांंतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती व प्रबोधन केल्यास याला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. असा विश्वास तंबाखू मुक्त शाळा अभियान चे जिल्हा समन्वयक संजय ठाणगे यांनी व्यक्त केला. ते महात्मा फुले विद्यालय कार्वे येथे आयोजित चंदगड तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी के.आय. पाटील होते.
स्वागत केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर यांनी केले. प्रस्ताविक केंद्रप्रमुख वाय.के. चौधरी यांनी केले. यावेळी पुढे बोलताना ठाणगे म्हणाले तंबाखूत शेकडो प्रकारची विषारी रसायने असतात. त्यामुळे तंबाखू व्यसन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. सध्या जिल्ह्यातील तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतिम टप्प्यात असून २५ नोव्हेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त घोषित केला जाणार आहे. या दिवसापासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचा परिसर तंबाखू निषिद्ध क्षेत्र ठरणार आहे. त्यामुळे शाळेच्या १०० यार्ड त्रिज्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेट आदीचे सेवन, विक्री करणे हा दंडनीय अपराध ठरणार आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
आपली शाळा तंबाखूमुक्त ठरविण्यासाठी आवश्यक असलेले अकरा निकष पूर्तता करून ती माहिती सलाम मुंबई या ॲपवर फोटोसह भरण्याची आहे याबद्दलचे विवेचन झाले. तालुक्यातील निम्म्या शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात आल्या असून उर्वरित शाळांनी २० नोव्हेंबर पर्यंत निकष पूर्तता करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका समन्वयक दशरथ सूर्यवंशी, शशिकांत सुतार, गजानन बैनवाड, जिल्हा समन्वयक बसवराज कुंभार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तंबाखू मुक्त अभियानातील संभाजी पाटील, श्रीकांत पाटील, भरमाणा मुरकुटे, बी. आर. तेरणीकर आदी तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शशिकांत सुतार यांनी शेवटी उपस्थितांना तंबाखूमुक्त शपथ देवविली. आभार वाय.के. चौधरी यांनी मानले.
No comments:
Post a Comment