कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विनायक कांबळे यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2019

कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विनायक कांबळे यांची बिनविरोध निवड

विनायक पुंडलिंक कांबळे

कालकुंद्री / प्रतिनिधी 
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील बहुचर्चित ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत विनायक पुंडलिक कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गेल्या चार वर्षात सरपंच दयानंद कांबळे यांच्यावर दोन वेळा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. पहिल्या अविश्वास ठराव मंजुरीनंतर पुन्हा तेच सरपंच राहिले. ग्रामपंचायत बरखास्त होईल या इराद्याने सर्व सदस्यांनी राजीनामे दिले. पण प्रशासनाने पोटनिवडणूक लावली. यात पुन्हा राजीनामा दिलेल्या पॅनेलचे सर्व सदस्य निवडून आले. तथापि सरपंच म्हणून दयानंद कांबळे हेच राहिल्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्यांदा अविश्वास ठराव आणण्याची महाराष्ट्रातील एकमेव घटना झाली.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पुन्हा सरपंचपदी कोण? हा प्रश्न निर्माण झाला दोन महिन्याच्या न्यायालयीन लढाईनंतर काल सरपंच पदासाठी मंडलाधिकारी दयानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. अनुसूचित जाती साठी राखीव सरपंच पदासाठी विनायक कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यावेळी उपसरपंच सुरेश नाईक. सदस्य उमा शंकर मुर्डेकर, संगीता कल्लाप्पा पाटील, गीता शिवाजी नाईक, लक्ष्मी पुंडलीक नाईक, अनिता अनिल तेऊरवाडकर, पांडुरंग गायकवाड उपस्थित होते. तर ईश्वर वरपे, दयानंद कांबळे, कांचन पाटील गैरहजर राहिले. सत्ताधारी पॅनेलचे समर्थक एम. जे. पाटील, जे. एस. पाटील, तंटामुक्त अध्यक्ष भागोजी पाटील, अशोक रामू पाटील, शिवाजी कोकितकर, कल्लाप्पा जोशी, शिवाजी नाईक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक व्ही. बी. भोगण यांनी मानले. ग्रामपंचायत कालावधी संपण्यासाठी सात महिने जरी राहिले असले तरी या काळात गावात सर्वांच्या सहकार्याने विविध लोकोपयोगी योजना राबवून गाव विकासात अग्रेसर करू.असा विश्वास विनायक कांबळे यांनी निवडीनंतर व्यक्त केला.

No comments:

Post a Comment