एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पैसे देणार – मानसिंगराव खोराटे, दौलतच्या 37 व्या गळीत हंगामाला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2019

एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पैसे देणार – मानसिंगराव खोराटे, दौलतच्या 37 व्या गळीत हंगामाला प्रारंभ

अथर्व संचलित दौलतच्या 37 व्या गळीत हंगामाला प्रारंभ
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत अथर्वच्या 37 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ करताना अथर्वचे मानसिंगराव खराटे, सौ. मनीषा खोराटे, राजू देसाई, गोपाळराव पाटील, अशोक जाधव, संजय पाटील, प्रभाकर खांडेकर, ॲड. संतोष मळवीकर आदी.
चंदगड / प्रतिनिधी
उत्पादकांच्या विश्वासावर 162 कोटीचे कर्ज अंगावर घेऊन दौलत कारखाना चालवायचे धाडस केले आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकायचे असेल तर इतर कारखान्याच्या प्रमाने शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वेळेवर देऊन शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करणे आज गरजेचे आहे. भविष्यात दौलत चांगल्या पद्धतीने चालवावा असे काम आज आम्ही करत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे एफआरपीप्रमाणे वेळेत देण्याचे नियोजन केल्याचे अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी सांगितले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व संचलित दौलतच्या 37 व्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
        अथर्व संचलित दौलतच्या गळीत हंगाम शुभारंभाचा व्हीडीओ पाहण्यासाठी वरील व्हीडीओवर क्लिक करा.
अथर्वचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी प्रास्ताविक करून दौलत-अथर्व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून उच्चांकी गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला. चेअरमन श्री. खोराटे पुढे म्हणाले, ``महापुराने यावर्षी उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी एफरआरपी घटणार आहे. साखर उद्योगही आर्थिक संकटात आला आहे. पण अनेक संकटावर मात करून अथर्वने दौलत सुरू केला आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारखान्याची राजकारणविरहित वाटचाल करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी थेट बांधापर्यंत अनेक ऊस विकास योजना राबविणार आहे. चोख व्यवस्थापनामुळे कारखान्याचा कारभार पारदर्शक ठेवून शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे पैसे देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस दौलत कारखान्यांना पाठवावा असे आवाहन केले. दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी शेतकरी व कामगार ही कारखान्यातील दोन चाके आहेत. दौलत चांगला चालविण्यासाठी कामगारांनी सतर्क राहावे. दौलत मधील सवलत बंद झाल्याने दौलत चांगला चालेल असे सांगून शेतकऱ्यांनी आपला ऊस दौलतलाच पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
यावेळी ॲड. संतोष मळवीकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सरपंच एकनाथ कांबळे अध्यक्ष अशोक जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर गोकुळचे संचालक दीपक पाटील, महादेव कांबळे, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक प्रमोद धुरी, प्रकाश गवस, रणधीर चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, भरमाना गावडा, विष्णुपंत यादव, गोविंद पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, एम. जे. पाटील, वसंत निकम, उत्तम पाटील, सचिन पाटील आदींसह शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक विजय कोलकार यांनी सुत्रसंचालन केले. व्यंकटेश ज्योती यांनी आभार मानले. 
                                                  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आभार
बरीच वर्षे बंद असलेल्या दौलत कारखान्याचा इतिहास बघून कोणीही कर्ज देण्यास तयार होत नव्हते. पण केवळ दौलतसाठी कर्जपुरवठा करून 2019-20 च्या गळीत हंगामाला सहकार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे यावेळी अथर्वचे मानसिंग खराटे यांनी विशेष आभार मानले. दौलत कारखाना काटकसरीने चालवून सर्वांचा विश्वास संपादन करणार आहे. भविष्यात दौलतला कर्जपुरवठा करतो म्हणून बँकांची रांग लागेल असाही विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment