तरुणाच्या धाडसामुळे दोन महिलांना जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2019

तरुणाच्या धाडसामुळे दोन महिलांना जीवदान


चंदगड / प्रतिनिधी
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) 16 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी चारच्या सुमारास गावातील दोन महिला भात कापणी उरकून हात पाय धुण्यासाठी विहिरीवर गेल्या असताना सौ. प्रमिला प्रधान यांचा शेवाळा वरून पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी सौ. मालू प्रधान यांनी आपला हात दिला व त्यांचाही तोल जाऊन त्याही पाण्यामध्ये पडल्या. त्याचवेळी तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडा-ओरडा सुरु केला पण कोणीही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.त्याच वेळी थोड्याच अंतरावर असलेल्या कु.राहुल सुरेश पाटील (वय 25) जिगरबाज युवकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता विहिरीमध्ये उडी घेऊन व सौ. मालू प्रधान यांना प्रथम सुखरूपपणे बाहेर काढले. या कालावधीमध्ये सौ. प्रमिला प्रधान यांनी आपल्या जगण्याची आस सोडून दिली होती आणि त्या विहिरीच्या तळाशी गेल्या होत्या. पुन्हा राहुलने पाण्यामध्ये उडी घेऊन तळाशी गेलेल्या सौ. प्रमिला प्रधान यांना सुखरूपपणे बाहेर काढले, पण त्या बेशुद्धावस्थेत होत्या. हे पाहून राहुल ने स्वतःच्या घरी धाव घेतली व घरातून साखर आणली व त्या महिलेला खायला घातली व त्यांना शुद्धीवर आणले. राहुलच्या या धाडसी कृत्याचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे. या त्याच्या धाडसी कृत्याचे अर्जुनवाडी ग्रामस्थांकडून व आदर्श मराठा बॉईज अर्जुनवाडी या मंडळाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

No comments:

Post a Comment