ओला दुष्काळ जाहीर करुन संपुर्ण कर्जमाफीसाठी बळीराजा संघटनेचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2019

ओला दुष्काळ जाहीर करुन संपुर्ण कर्जमाफीसाठी बळीराजा संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

चंदगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देताना बळीराजा संघटनेचे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष नितीन पाटील
चंदगड / प्रतिनिधी
यावर्षी मान्सूनच्या पावसाने शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे. जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिना आला तरी सुरुच आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती नष्ट झाले आहे. उरलीसुरली खरिपाची पिके परतीच्या पावसाने झोडपल्याने जमीनदोस्त झाली आहेत. भात, नाचना, बटाटे, सोयाबीन इत्यादी पिके धोक्यात आली आहेत. यंदाच्या हंगामात उघडझाप झाली नसल्याने रताळी पीक नावालाच उरले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष नितीन पाटील यांनी तहसीलदार विनोद रणवरे यांना  शेतकर्‍यांच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करुन संपुर्ण कर्जमाफी द्या, शासनापर्यंत कोणी पोहोचविला शेतकऱ्यांचा आवाज.

परतीच्या पावसामुळे वैरण कुजल्याने शेतकऱ्यांचा एकमेव जोडधंदा असलेला दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जनावारांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न बनला आहे. शेतकऱ्यांच्या हाताला चार पैसे मिळवून देणारा दूध धंदा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी जाहीर झालेली अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच उरलीसुरली पिके हत्ती आणि गव्यांच्या उपद्रवामुळे वाया जात आहेत. अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे समस्त शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे महापुरानंतर घोषणा केलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई देवून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनावर नितीन पाटील यांच्यासह मधुकर पाटील, अशोक मोहिते, गोविंद पाटील, दत्तात्रय पाटील, परसराम शिंदे, गजानन पाटील, वैजू पाटील, रमेश भांबर, पंकज तेलंग, यशवर्धन सावंत-भोसले, नारायण आवडण, बाळकृष्ण दळवी, विठ्ठल सुतार, प्रल्हाद गुरव, अशोक दोरी आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment