विद्युत उपकरणे धूळखात पडून
![]() |
चंदगड येथे कक्ष अधिकारी यांना शिक्षक समितीतर्फे निवेदन देताना शंकर मनमाडकर. गोविंद पाटील. राजू जोशी, बाबू परीट आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची विद्युत बिले ज्या त्या गावच्या ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून भरावीत असा स्पष्ट आदेश जि प कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यापूर्वीच काढला आहे. तथापि बहुतेक ग्रामपंचायतींनी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आलेली बिले शाळांनी ग्रामपंचायतीकडे पाठवली पण ती भरणा न झाल्याने चंदगड तालुक्यातील बहुतांश शाळांची वीज कंपनीने खंडित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण झाले आहेत.
तालुक्यात अपवाद वगळता सर्व शाळांत ई-लर्निंग प्रोजेक्टर, अँड्रॉइड टीव्ही, संगणक आदी इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साधनांचा अध्ययन अध्यापनात नियमित व मोठ्या प्रमाणात वापर होतो. वीजपुरवठा नसल्याने ही सर्व उपकरणे धूळखात पडून आहे. सध्या केंद्र व तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, स्नेहसंमेलन यांची तयारी जोरात सुरु असताना खंडित वीज पुरवठ्यामुळे संगीत उपकरणे स्पीकर संच इलेक्ट्रॉनिक वाद्ये कुचकामी ठरली आहेत. तर अंधारामुळे सायंकाळची स्पर्धा तयारी, शाळांच्या रात्र अभ्यासिका ठप्प आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व तालुक्यात ग्रापं कडून बिले भरली जातात मात्र चंदगडमध्ये विपरीत स्थिती आहे. याबद्दल शिक्षक व पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ व सर्व संघटना समन्वय समितीने पं. स. गटविकास अधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन विज बिले भरण्याची विनंती करण्यात आली आहे. तर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती व पालक आंदोलनाच्या तयारीत आहेत. शाळांच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या या बाबीकडे मा. मुख्य. कार्य. अधिकारी अमन मित्तल यांनी हस्तक्षेप करून ग्रामपंचायतींना शाळांचे वीज बिल भरणा करणेबाबत आदेशित करावे. अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment